स्मार्ट सर्विस ठेकेदाराच्या कारभाराविरुद्ध संताप
जळगाव (प्रतिनिधी):- येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयामध्ये कक्ष सेवक, लिपिक यांसह विविध पदांवर कार्यरत असलेल्या कंत्राटी कर्मचाऱ्यांचे गेल्या दोन महिन्यांपासून वेतन न झाल्याने कर्मचाऱ्यांमध्ये प्रचंड असंतोष निर्माण झाला आहे. रुग्णालयासारख्या अत्यंत महत्त्वाच्या ठिकाणी अहोरात्र सेवा बजावणाऱ्या या कर्मचाऱ्यांवर वेळेवर वेतन न मिळाल्याने उपासमारीची आणि आर्थिक कोंडीची वेळ आली आहे.

वेतनाअभावी कर्मचाऱ्यांचे हाल; हप्ते थकले, किराणा उधारीवर
वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयाकडून (DMER) नियुक्त आणि ‘स्मार्ट सर्विस’ संस्थेअंतर्गत कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांचे मे आणि जून महिन्याचे वेतन अद्याप मिळालेले नाही. तर इतर लिपिक, कक्षसेवक, टेलिफोन ऑपरेटर, प्लंबर, फिटर, इलेक्ट्रिशियन आणि लिफ्टमन या आणि इतर पदांवरील कर्मचाऱ्यांचे जून महिन्याचे वेतन थकीत आहे.
वेतन वेळेवर न मिळाल्यामुळे कर्मचाऱ्यांचे बँकेचे हप्ते (EMI) थकले असून घरात किराणा भरण्यासाठी उधारीवर पैसे घेण्याची वेळ आली आहे. मानसिक तणावामुळे रुग्णालयीन कामांवरही याचा विपरीत परिणाम होत असून चुकांचे प्रमाण वाढत आहे. असे असतानाही स्मार्ट सर्विसच्या ठेकेदारांनी या गंभीर समस्येकडे सोयीस्करपणे दुर्लक्ष केले आहे.
लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाकडूनही पदरी निराशा
आपली व्यथा मांडण्यासाठी कर्मचाऱ्यांनी आमदार राजूमामा भोळे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यात यश आले नाही. तसेच शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. गिरीश ठाकूर यांच्याकडे कर्मचाऱ्यांनी तोंडी तक्रार केली असता, “होईल पगार, मी ठेकेदाराला सांगतो,” असे मोघम उत्तर मिळालेली माहिती कर्मचाऱ्यांकडून मिळाली आहे.
भत्ता वाढ न मिळाल्यानेही असंतोष
वेळच्या वेळी वेतन न मिळण्यासोबतच कर्मचाऱ्यांना ठरल्याप्रमाणे भत्ता वाढ देखील देण्यात आलेली नाही. प्रशासकीय आणि ठेकेदाराच्या या उदासीन धोरणामुळे कर्मचाऱ्यांमध्ये कमालीचा रोष पसरला असून, थकीत वेतन व भत्ता वाढ तातडीने न मिळाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा कर्मचाऱ्यांकडून दिला जात आहे.








