पोलीस अधिकारी असल्याची बतावणी करून माजी सैनिकाला १० लाखांचा गंडा

सायबर पोलिसांत गुन्हा दाखल
जळगाव (प्रतिनिधी) :पोलीस अधिकारी असल्याची बतावणी करत व्हॉट्सअॅपद्वारे संपर्क साधून एका ७० वर्षीय माजी सैनिकाची १० लाखांची ऑनलाइन फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी जळगाव सायबर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ३१८(४), ३(५) तसेच माहिती तंत्रज्ञान अधिनियमाच्या कलम ६६(डी) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दामोदर राजधर चौधरी (वय ७०, व्यवसाय – माजी सैनिक, रा. फुलगाव, ता. भुसावळ, जि. जळगाव) यांच्याशी २५ फेब्रुवारी ते १६ मार्च २०२६ या कालावधीत ७७३८९४१५१२ या मोबाईल क्रमांकावरून स्वतःचे नाव संदीप शर्मा असल्याचे सांगणाऱ्या व्यक्तीने व्हॉट्सअॅपवर संपर्क साधला. संबंधिताने स्वतःला पोलीस अधिकारी असल्याचे भासवून विश्वास संपादन केला आणि विविध कारणे सांगत फिर्यादीकडून RTGS द्वारे १० लाख स्वतःच्या खात्यात वर्ग करून घेत फसवणूक केली.
फसवणुकीची बाब लक्षात आल्यानंतर दामोदर चौधरी यांनी सायबर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यांच्या फिर्यादीवरून संबंधित मोबाईलधारकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रदीप ठाकूर करीत आहेत.









