सेवानिवृत्त कर्मचाऱ्याच्या घरावर चोरट्यांचा डल्ला; सोन्याचे दागिने, रोख रक्कम लंपास

चाळीसगाव (प्रतिनिधी) : चाळीसगाव शहरातील गजबजलेल्या गजानन कन्स्ट्रक्शन परिसरात बंद असलेल्या घरावर अज्ञात चोरट्यांनी डल्ला मारत २ लाख ५४ हजार ३४० रुपयांचा ऐवज लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांनी तपासाला वेग दिला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गजानन कन्स्ट्रक्शन परिसरातील ७-बी येथे राहणारे चंदन बाळकृष्ण अमरुतकर (वय ६७) हे सेवानिवृत्त कर्मचारी असून ते कुटुंबासह बाहेरगावी गेले होते. ८ जून ते २१ जुलै २०२६ या कालावधीत त्यांचे घर बंद असल्याची संधी साधत अज्ञात चोरट्यांनी मुख्य दरवाजाचे कडी-कोयंडे तोडून घरात प्रवेश केला आणि मौल्यवान ऐवजावर हात साफ केला.
घरफोडीत २० हजार रुपये रोख, सुमारे १५ ग्रॅमचा सोन्याचा नेकलेस, ३४ ग्रॅमची सोन्याची पोत, ४ ग्रॅमची सोन्याची अंगठी, १७ ग्रॅम वजनाचे सोन्याचे तुकडे असा एकूण २ लाख ५४ हजार ३४० रुपयांचा ऐवज चोरीला गेला. विशेष म्हणजे, चोरट्यांनी बँक ऑफ महाराष्ट्रच्या लॉकरची किल्ली देखील लंपास केली आहे.
चंदन अमरुतकर हे २४ जुलै रोजी घरी परतल्यानंतर घरफोडीचा प्रकार त्यांच्या निदर्शनास आला. त्यांनी तातडीने चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.
अमरुतकर यांच्या फिर्यादीवरून भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ३०५, ३३१(३) आणि ३३१(४) अन्वये अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक अमितकुमार मनेळ यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक भरत चौधरी करीत असून, संशयितांचा शोध सुरू आहे.









