NEET-UG गैरव्यवहार प्रकरणी केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा; विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी पद सोडल्याचा दावा

नवी दिल्ली: NEET-UG परीक्षेतील कथित गैरव्यवहार आणि गोंधळावरून देशभरात पेटलेल्या तीव्र वादाच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी अखेर आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. त्यांनी आपला राजीनामा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे सुपूर्द केला असून, जंतर-मंतरवर गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाची दखल घेत हा निर्णय घेतल्याचे स्पष्ट केले आहे. धर्मेंद्र प्रधान यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या राजीनाम्याची माहिती देत पद सोडण्यामागील सविस्तर भूमिका मांडली आहे.
आपल्या पत्रात धर्मेंद्र प्रधान यांनी नमूद केले की, गेल्या चार दशकांहून अधिक काळ ते विद्यार्थी, शिक्षक आणि शिक्षण क्षेत्रातील विविध सुधारणांसाठी समर्पित राहिले आहेत. मजबूत, सर्वसमावेशक आणि दूरदृष्टी असलेली शिक्षण व्यवस्था हीच कोणत्याही राष्ट्राच्या शाश्वत विकासाची पायाभूत गरज असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. NEET-UG परीक्षेतील गोंधळाबाबत बोलताना ते म्हणाले की, ३ मे २०२६ रोजी झालेल्या परीक्षेत गैरव्यवहाराच्या तक्रारी समोर येताच सरकारने तातडीने कठोर पावले उचलली होती. या संपूर्ण प्रकरणाचा तपास केंद्रीय अन्वेषण विभागाकडे (CBI) सोपवण्यात आला, तसेच मूळ परीक्षा रद्द करून ती नव्याने घेण्याचा निर्णय घेण्यात आला होता. एवढेच नव्हे तर पुढील वर्षापासून ही परीक्षा पूर्णपणे संगणक आधारित (CBT) पद्धतीने घेण्याची महत्त्वपूर्ण घोषणाही करण्यात आली होती.
सुमारे २० लाखांहून अधिक विद्यार्थ्यांची ही परीक्षा अत्यंत निष्पक्ष आणि पारदर्शक वातावरणात पार पाडणे ही आपली सर्वोच्च प्राथमिकता होती, असे प्रधान यांनी पत्रात म्हटले आहे. यासाठी सर्व राज्य सरकारे, जिल्हा प्रशासन, विद्यार्थी आणि पालकांच्या सहकार्याने २१ जून २०२६ रोजी पुनर्रचना केलेली परीक्षा यशस्वीरीत्या घेण्यात आली. त्यानंतर १६ जुलै रोजी जाहीर झालेल्या निकालांमध्ये गरीब आणि वंचित घटकांतील अनेक गुणवंत विद्यार्थ्यांनी यश मिळवले. मात्र, काही जबाबदार पदांवर असलेल्या व्यक्तींनी या संपूर्ण मुद्द्याचे राजकारण करत विद्यार्थ्यांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला, या प्रकारामुळे आपल्याला मोठा धक्का बसल्याचे त्यांनी नमूद केले.
राजीनाम्याच्या कारणांचा पुनरुच्चार करताना धर्मेंद्र प्रधान यांनी स्पष्ट केले की, गेल्या १० दिवसांत घडलेल्या विविध घटनांनी त्यांना अत्यंत व्यथित केले आहे. हा निर्णय त्यांच्या वैयक्तिक प्रतिष्ठेचा विषय नसून देशातील कोट्यवधी तरुणांच्या भवितव्याशी थेट जोडलेला आहे. विद्यार्थ्यांचे उज्ज्वल भविष्य कोणत्या कायदेशीर वादात किंवा राजकीय संघर्षात अडकू नये आणि त्यांचे लक्ष शिक्षणापासून विचलित होऊ नये, याच उदात्त भावनेतून आपण मंत्रिपदाचा त्याग करत असल्याचे त्यांनी आपल्या पत्राच्या शेवटी सांगितले.









