देशभक्ती, राष्ट्रसेवा आणि सामाजिक बांधिलकीचा संदेश; मान्यवरांनी विचारांचे स्मरण करून अर्पण केली आदरांजली
जळगाव (प्रतिनिधी): स्वातंत्र्यलढ्यातील महान राष्ट्रपुरुष लोकमान्य बाळ गंगाधर टिळक आणि अमर क्रांतिकारक चंद्रशेखर आझाद यांच्या जयंतीनिमित्त डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात यावेळी दोन्ही महान विभूतींच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून त्यांच्या कार्याला विनम्र अभिवादन करण्यात आले. कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांनी लोकमान्य टिळकांनी दिलेला “स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच” हा संदेश आजही प्रत्येक भारतीयाला प्रेरणा देणारा असल्याचे सांगितले. तसेच क्रांतिकारक चंद्रशेखर आझाद यांच्या अदम्य शौर्य, त्याग आणि राष्ट्रभक्तीचे स्मरण करून त्यांच्या जीवनातून देशसेवा, धैर्य आणि निस्वार्थ समर्पणाची प्रेरणा घेण्याचे आवाहन करण्यात आले. दोन्ही नेत्यांची जयंती २३ जुलै रोजी देशभर साजरी केली जाते.यावेळी वैद्यकीय महाविद्यालयातील प्राध्यापक, डॉक्टर, निवासी डॉक्टर, परिचारिका, विद्यार्थी तसेच अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थितांनी राष्ट्रनिर्मितीसाठी आपल्या कार्यातून योगदान देण्याचा संकल्प व्यक्त केला.कार्यक्रमाच्या शेवटी राष्ट्रपुरुषांचे विचार समाजात रुजविणे आणि सेवाभाव, प्रामाणिकपणा व कर्तव्यनिष्ठा या मूल्यांचे जतन करणे हीच त्यांना खरी आदरांजली असल्याचे प्रतिपादन करण्यात आले.










