पुणे (वृत्तसंस्था) – काँग्रेसने दिलेल्या आदेशानुसार अरविंद शिंदे यांनी तडकाफडकी महापालिकेतील आपल्या गटनेते पदाचा राजीनामा दिला आहे. नवीन गटनेत्याचे नाव गुरुवारी जाहीर होणार असल्याचे समजते.
मागील ८ वर्षे गटनेता म्हणून शिंदे काम पाहत होते. या काळात त्यांनी महापालिका, शहर, राष्ट्रीय, केंद्रीय पातळीवरील अनेक समस्या सोडविण्यासाठी लढा दिला. महापालिकेच्या सभागृहात कमी नगरसेवक असतानाही अनेक विषय मांडले.
यावेळी त्यांनी ऍड. अभय छाजेड, अशोकराव चव्हाण, विरोधक, माझ्या पक्षातील नगरसेवक, पत्रकार यांनी मागील ८ वर्षांत सहकार्य केल्या बद्दल अरविंद शिंदे यांनी आभार मानले.आपण १९९७ पासून काँग्रेस पक्षात आहे. कधीही बाहेर गेलो नाही. आज ब्लॉक अध्यक्ष, पदाधिकारी यांचे मत विचारात घेण्यात आले. गटनेता बदलताना यापूर्वी केवळ नगरसेवकांचे मत घेतले जात होते. काँग्रेसचे निरीक्षक अनिल शर्मा यासाठी पुण्यात दाखल झाले आहेत.
माझे पद बदलताना माझे मत विचारात घ्यायला पाहिजे होते, अशी खंत शिंदे यांनी व्यक्त केली. 1 वर्षासाठी हे पद का बदलले, असा प्रश्न निर्माण झाला आहे. दरम्यान, काँग्रेसच्या ९ नगरसेवकांपैकी ७ जणांनी अरविंद शिंदे यांना गटनेता म्हणून कायम ठेवण्याची मागणी केल्याचे समजते.