
पाचोरा तालुक्यातील नांद्रा येथील घटना; पोलिसांची तातडीची कारवाई
पाचोरा (प्रतिनिधी) – पाचोरा तालुक्यातील नांद्रा येथील बंधुराज हॉटेलमध्ये दारूच्या वादातून हॉटेल कर्मचाऱ्याला मारहाण करून त्याच्या गळ्यातील सुमारे दोन लाख रुपये किमतीची दोन तोळ्यांची सोन्याची चेन आणि काउंटरमधील सहा हजार रुपयांची रोकड जबरदस्तीने घेऊन गेल्याची घटना घडली. या प्रकरणी पाचोरा पोलिसांनी दोघांना अटक केली आहे.


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी विलास युवराज तावडे (वय ५३, रा. नांद्रा, ता. पाचोरा) यांनी तक्रार दिली आहे. १४ जुलै रोजी रात्री साडेआठच्या सुमारास प्रकाश शांताराम पाटील (वय ३९, रा. नांद्रा, ता. पाचोरा) आणि संदीप युवराज तावडे (वय ४४, रा. चिंतामणी कॉलनी, पाचोरा) हे हॉटेलमध्ये आले. त्यांनी दारूची मागणी करत गोंधळ घातला आणि काचेचे ग्लास व बाटल्या फोडल्या.
हॉटेल कर्मचाऱ्यांनी त्यांना समजावण्याचा प्रयत्न केला असता दोघांनी फिर्यादीला मारहाण केली. त्यानंतर फिर्यादीच्या गळ्यातील सुमारे दोन लाख रुपये किमतीची दोन तोळ्यांची सोन्याची चेन हिसकावून घेतली. तसेच हॉटेलच्या काउंटरमधील ६ हजार रुपयांची रोकड घेऊन फिर्यादीचा मोबाईल फोडल्याचे तक्रारीत नमूद आहे. तसेच पोलीस ठाण्यात तक्रार केल्यास परिणाम भोगावे लागतील, अशी धमकीही दिल्याचे फिर्यादीने म्हटले आहे.
या प्रकरणी पाचोरा पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून प्रकाश शांताराम पाटील आणि संदीप युवराज तावडे या दोघांना पोलिसांनी अटक केली आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक कृष्णा घायाळ करीत आहे.










