
रोख रक्कम व सोन्या-चांदीचे दागिने लंपास; पारोळा पोलिसांत गुन्हा
जळगाव (प्रतिनिधी) – पारोळा शहरातील वर्धमान नगर परिसरात अज्ञात चोरट्यांनी बंद घराचे कुलूप तोडून घरफोडी करत रोख रक्कम आणि सोन्या-चांदीचे दागिने असा एकूण ६२ हजार रुपयांचा ऐवज लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी पारोळा पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १४ जुलै रोजी सायंकाळी ६.३० ते १५ जुलै रोजी सकाळी ६.३० या कालावधीत ही घरफोडी झाली. चोरट्यांनी घराचे कुलूप तोडून आत प्रवेश केला व घरातील ६० हजार रुपये किमतीचे सहा ग्रॅम सोन्याचे दागिने तसेच दोन हजार रुपये किमतीचे चांदीचे जोडवे असा एकूण ६२ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला.
याप्रकरणी ज्ञानेश्वर गोपीचंद पाटील (वय ४७, रा. वर्धमान नगर, पारोळा) यांनी १५ जुलै रोजी पारोळा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार भारतीय न्याय संहितेच्या कलम ३०५ व ३३१(४) अन्वये अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस हवालदार संजय पवार करीत आहेत.










