
परवानगीशिवाय वाळूची वाहतूक; चोपडा ग्रामीण पोलिसांत गुन्हा
चोपडा (प्रतिनिधी) – चोपडा तालुक्यातील अनेर नदीपात्रातून विनापरवाना वाळूची वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर-ट्रॉलीवर कारवाई करत पोलिसांनी सुमारे ४ लाख ५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी चालकाविरुद्ध चोपडा ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १५ जुलै रोजी सकाळी ६.३० वाजेच्या सुमारास वढोदा गावालगतच्या अनेर नदीपात्रात ही कारवाई करण्यात आली. दीपक आत्माराम भिल (वय २६, रा. वढोदा, ता. चोपडा) हा परवानगीशिवाय ट्रॅक्टर-ट्रॉलीत एक ब्रास वाळू भरून वाहतूक करत असल्याचे आढळून आले.
कारवाईदरम्यान सुमारे ४ लाख रुपये किमतीचा स्वराज ७४४ एफई ट्रॅक्टर (क्र. एमएच-२७ एल-५०८८), ट्रॉली तसेच सुमारे ५ हजार रुपये किमतीची एक ब्रास वाळू असा एकूण ४ लाख ५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
याप्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल मनेश वसंत गावीत यांच्या फिर्यादीवरून चोपडा ग्रामीण पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या कलम ३०३(२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल हेमंत कोळी करीत आहेत.










