
उपचारासाठी आलेल्या नागरिकाची हिरो फॅशन प्रो मोटारसायकल अज्ञात चोरट्याने पळविली; पोलिसांकडून तपास सुरू
जळगाव ( प्रतिनिधी ) – जळगाव शहरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सिव्हिल हॉस्पिटल परिसरात वाहनचोरीच्या घटना वाढत असल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे. सिव्हिल हॉस्पिटलच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर उभी केलेली सुमारे ३५ हजार रुपये किमतीची हिरो फॅशन प्रो मोटारसायकल अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची घटना घडली. याप्रकरणी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी मंगेश छगन वाघ (वय ३३, रा. लक्ष्मीनगर, मेहरूण, जळगाव) यांनी आपली हिरो फॅशन प्रो (क्र. MH-19 BZ-8114) ही मोटारसायकल ४ जुलै २०२६ रोजी सकाळी ११.४५ ते दुपारी १२.२० या वेळेत सिव्हिल हॉस्पिटलच्या मुख्य प्रवेशद्वारासमोरील रस्त्यालगत उभी केली होती. काम आटोपून परत आल्यानंतर मोटारसायकल जागेवर नसल्याचे त्यांच्या निदर्शनास आले.
सर्वत्र शोध घेऊनही वाहनाचा मागमूस न लागल्याने त्यांनी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. तक्रारीवरून भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३ मधील कलम ३०३(२) अन्वये अज्ञात चोरट्याविरुद्ध वाहनचोरीचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हवालदार महेंद्र पाटील करीत असून, परिसरातील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपीचा शोध सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.










