कोल्हापूर (वृत्तसंस्था) – जगभरात तांडव करणारा कोरोना आता महाराष्ट्रात देखील दाखल झाला आहे. पुण्यात कोरोनाचे 5 रूग्ण सापडले आहेत. त्यामुळे महाराष्ट्रात मोठी दहशत पसरली आहे. कोरोनापासून वाचण्यासाठी नागरिकांनी प्रतिबंधात्मक उपाययोजना सुरू केल्या आहेत. याच पार्श्वभूमीवर कोल्हापूर पोलिसांचं विचार करायला लावणारं ट्वीट व्हायरल झालं आहे. कोरोनाने एक व्यक्ती मयत झाला तर हजारोंनी मास्क घेतले… अपघाताने दररोज 600 लोक मरतात.. कोणीच नाही जात हेल्मेट घ्यायला…का???, असा रोकडा पण विचार करायला लावणारा सवाल कोल्हापूर पोलिसांनी विचारला आहे. यासंबंधी त्यांनी ‘कोल्हापूर पोलिस’ या ट्वीटर हँडलवरून ट्वीट केलं आहे.
कोल्हापूर पोलिसांचं हे ट्वीट सध्या जोरदार व्हायरल होत आहे. तसंच युजर्सनेही त्यांच्या या ट्वीटला सकारात्मक घेतलं आहे. खरंच लोकांनी हेल्मेट घ्यायला पाहिजे, असं काही ट्वीटकर्त्यांनी म्हटलं आहे.दरम्यान, भारतामध्ये तसंच महाराष्ट्रामध्ये रोड अॅक्सिडेंटचं प्रमाण अधिक आहे. सुरक्षिततेसंबंधी किंवा हेल्मेट वापरण्यास नागरिक टाळाटाळ करतात. अनेक वेळा पोलिसांनी सांगूनही लोकं त्याकडे दुर्लक्ष करतात. मात्र आता पोलिसांनी बरोबर टायमिंग साधत कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रोकडा सवाल विचारणारा हेल्मेटचा मुद्दा उपस्थित केला आहे.