जळगाव (प्रतिनिधी) :- अमली पदार्थांच्या वाढत्या विळख्यातून तरुण पिढीला वाचवण्यासाठी आणि जिल्ह्यातील तस्करीचे जाळे उद्ध्वस्त करण्यासाठी जळगाव जिल्हा पोलिसांनी एक मोठे पाऊल उचलले आहे, वेगवेगळ्या कारवायांमध्ये जप्त करण्यात आलेला तब्बल ९५८.०७० किलो गांजा नष्ट करण्याची प्रक्रिया पोलिसांनी सुरू केली असून, न्यायालयाच्या कायदेशीर आदेशानुसार आणि एनडीपीएस (NDPS) कायद्यातील तरतुदींनुसार या कोट्यवधी रुपयांच्या अमली पदार्थांची सुरक्षितरीत्या विल्हेवाट लावली जात आहे.


जिल्ह्यातील पाच वेगवेगळ्या पोलीस ठाण्यांतर्गत अमली पदार्थ विरोधी कायद्यान्वये दाखल गुन्ह्यांमधून हा गांजा जप्त करण्यात आला होता, ज्यामध्ये चोपडा ग्रामीण पोलीस ठाण्यातील तीन गुन्ह्यांमध्ये ४३२.२४० किलो, मुक्ताईनगर पोलीस ठाण्यातील दोन गुन्ह्यांमध्ये २६२.४३० किलो, एरंडोल पोलीस ठाण्यातील गुन्ह्यात १८२ किलो, जळगाव तालुका पोलीस ठाण्यातील गुन्ह्यात ५८ किलो आणि जामनेर पोलीस ठाण्यातील गुन्ह्यात २२ किलो गांजाचा समावेश आहे, यातील काही प्रकरणांमध्ये न्यायालयाचे अंतिम निकाल लागले असून काही प्रकरणे अद्याप न्यायप्रविष्ट आहेत, मात्र कायदेशीर प्रक्रियेचा अवलंब करून या सर्व साठ्याचा नाश केला जात आहे.
जिल्हा पोलिसांनी अमली पदार्थांच्या अवैध व्यापाराविरोधात अत्यंत कडक भूमिका घेतली असून, भविष्यातही तस्करांविरोधातील ही मोहीम अधिक तीव्र केली जाईल, तरुण पिढीला व्यसनाधीनतेपासून वाचवण्यासाठी पोलिसांचे हे पाऊल अत्यंत महत्त्वाचे मानले जात असून, या धडक कारवाईमुळे अमली पदार्थ माफियांचे धाबे दणाणले आहेत.









