जामनेर-कुऱ्हा बसमधील घटना; अज्ञात चोरट्याविरुद्ध भुसवाळ तालुका पोलिसांत गुन्हा दाखल
भुसवाळ (प्रतिनिधी): एसटी बसमधून प्रवास करणाऱ्या एका ७१ वर्षीय वृद्ध शेतकऱ्याच्या पॅन्टच्या चोर खिशातून अज्ञात भामट्याने तब्बल ३ लाख ६० हजार रुपये किमतीचे ९ तोळे सोन्याचे दागिने चोरून नेल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. हा प्रकार जामनेर ते कुऱ्हा (ता. भुसवाळ) दरम्यान धावणाऱ्या बसमध्ये लोहारा ते भुसवाळ या प्रवासादरम्यान घडला.


बसमधील गर्दीचा फायदा घेत डल्ला
मिळालेल्या माहितीनुसार, जामनेर तालुक्यातील शेंगोळा येथील रहिवासी कांतीलाल मोतीलाल चोपडा (वय ७१) हे ३ जुलै २०२६ रोजी बसने प्रवास करत होते. सकाळी ११:२० ते ११:४५ वाजेच्या सुमारास लोहारा ते भुसवाळ दरम्यान बसमध्ये प्रवास करत असताना, त्यांनी आपल्या पॅन्टच्या चोर खिशात एका पाऊचमध्ये ९ तोळ्यांचे सोन्याचे दागिने सुरक्षित ठेवले होते. मात्र, बसमधील गर्दीचा किंवा प्रवासातील गडबडीचा फायदा घेत कोणातरी अज्ञात चोरट्याने अत्यंत चालाखीने त्यांच्या संमतीशिवाय, लबाडीच्या इराद्याने खिशातील दागिन्यांचे पाऊच चोरून नेले. भुसवाळला उतरल्यानंतर हा चोरीचा प्रकार फिर्यादी यांच्या लक्षात आला.
भुसवाळ तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
दागिने चोरीला गेल्याचे समजताच कांतीलाल चोपडा यांनी भुसवाळ तालुका पोलीस ठाण्यात धाव घेतली. त्यांनी ४ जुलै २०२६ रोजी सायंकाळी ६.१८ वाजता दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्याविरुद्ध भुसवाळ तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा रजि. नं. १३०/२०२६ नुसार भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३ च्या कलम ३०५(क) प्रमाणे चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
‘ई-साक्ष’ प्रणालीचा वापर आणि पुढील तपास
या गुन्ह्याची नोंद करताना पोलिसांकडून ‘ई-साक्ष’ प्रणालीचा वापर करण्यात आला आहे. भुसवाळ तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक निलेश गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक (पीएसआय) संजय कंखरे हे या चोरीच्या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत. या घटनेमुळे बस प्रवासादरम्यान प्रवाशांनी आपल्या मौल्यवान वस्तूंची काळजी घ्यावी, असे आवाहन पोलिसांमार्फत करण्यात आले आहे.









