जळगाव (प्रतिनिधी) :- शहरातील रामेश्वर कॉलनी परिसरात तिसऱ्या मजल्यावरील ओल्या जागेवरून पाय घसरून खाली पडल्याने दीड वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून चव्हाण कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

मृत चिमुकल्याचे नाव हर्षीत रामेश्वर चव्हाण (वय दीड वर्ष, रा. हनुमान नगर, रामेश्वर कॉलनी) असे आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, रामेश्वर चव्हाण हे पत्नी आणि मुलगा हर्षीत यांच्यासह रामेश्वर कॉलनीतील हनुमान नगर परिसरात तिसऱ्या मजल्यावर वास्तव्यास आहेत. ते शहरातील एका खासगी रुग्णालयात काम करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात.
शनिवारी (दि. २७ जून) दुपारच्या सुमारास घरासमोर पाणी सांडल्याने जागा ओली झाली होती. याचवेळी खेळत असलेल्या हर्षीतचा पाय घसरला आणि तो थेट तिसऱ्या मजल्यावरून खाली कोसळला.
घटनेनंतर कुटुंबीय आणि परिसरातील नागरिकांनी तात्काळ चिमुकल्याला गंभीर अवस्थेत खासगी रुग्णालयात दाखल केले. डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्याच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू होते. मात्र, उपचारादरम्यान मध्यरात्रीच्या सुमारास त्याची प्राणज्योत मालवली.
हर्षीत हा चव्हाण दाम्पत्याचा एकुलता एक मुलगा होता. त्याच्या अकाली निधनामुळे कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून परिसरात शोककळा पसरली आहे. चिमुकल्याच्या निधनाची वार्ता समजताच नातेवाईक आणि नागरिकांनी रुग्णालयात धाव घेतली. या दुर्दैवी घटनेमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.









