जळगाव (प्रतिनिधी) :- जळगाव शहरातील अनेक हॉटेल, खाद्यपदार्थ विक्रेते आणि सुपरशॉपमध्ये मुदतबाह्य वस्तूंची विक्री, विनापरवाना व्यवसाय तसेच अस्वच्छतेचे प्रकार सुरू असल्याची तक्रार अॅड. हारुल देवरे यांनी अन्न व औषध प्रशासन विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्याकडे ई-मेलद्वारे केली आहे.

तक्रारीनुसार, शहरातील अनेक हॉटेल, खाद्यपदार्थ विक्री केंद्रे आणि सुपरशॉपमध्ये स्वच्छतेच्या नियमांचे पालन होत नसून शीतपेयांच्या विक्रीचीही योग्य तपासणी केली जात नसल्याचा आरोप करण्यात आला आहे. अन्न व औषध प्रशासनाकडून याबाबत प्रभावी कारवाई होत नसल्याचेही तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
याशिवाय, अनेक दुकाने आणि पानटपऱ्यांवर प्रतिबंधित विमल गुटख्याची खुलेआम विक्री होत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. विनापरवाना सुरू असलेल्या वरण-भात केंद्रे, शेवभाजी केंद्रे, पोहे व मिसळ विक्रेत्यांची नावेही तक्रारीत नमूद करण्यात आली आहेत.
अनेक खाद्यपदार्थ विक्री केंद्रांमध्ये काम करणारे कारागीर अस्वच्छ परिस्थितीत काम करत असतानाही संबंधित विभागाकडून कारवाई होत नसल्याचेही अॅड. देवरे यांनी आपल्या तक्रारीत म्हटले आहे.
या तक्रारीची अन्न व औषध प्रशासन विभागाकडून कितपत दखल घेतली जाते आणि सोमवारी कोणती कारवाई होते, याकडे आता शहरवासीयांचे लक्ष लागले आहे.









