जळगाव ( प्रतिनिधी ) – शहरातील शिवाजीनगर परिसरात घरफोडीची घटना उघडकीस आली असून चोरट्यांनी घरातून सुमारे ६३ हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केला आहे. या प्रकरणी जळगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून दोन संशयितांना ताब्यात घेण्यात आले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शिवाजीनगर, भगतसिंग चौक परिसरातील घर क्रमांक १९६ येथे राहणारे सुशील भाऊलाल भावसार (वय ६१) यांच्या घरी २५ जून रोजी रात्री १० ते २६ जून रोजी सकाळी ७ वाजेदरम्यान अज्ञात चोरट्यांनी घरफोडी केली.
चोरट्यांनी घरातून एक डेल कंपनीचा लॅपटॉप (किंमत ४२ हजार रुपये), सॅमसंग कंपनीचा मोबाईल (१ हजार रुपये), नोकिया कंपनीचा अँड्रॉइड मोबाईल (१५ हजार रुपये), दोन किलो वजनाची पितळी कढई (२ हजार रुपये) तसेच ३ हजार रुपये रोख रक्कम असा एकूण ६३ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला.
या प्रकरणी जळगाव शहर पोलीस ठाण्यात बीएनएस कलम ३३१(४) व ३०५(अ) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी राफत शेख फिरोज आणि शारिम शेख मुसेफ उर्फ मुसाब या दोन संशयितांना ताब्यात घेतले असून पुढील तपास पोलीस निरीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली पोहेकॉ. योगेश पाटील करीत आहेत.









