जळगाव (प्रतिनिधी) : वीटभट्टीवर कामासाठी जात असताना ट्रॅक्टरवरून खाली पडलेल्या तरुण मजुराच्या अंगावरून ट्रॅक्टरचे चाक गेल्याने त्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना आव्हाणे गावाजवळ घडली. या प्रकरणी ट्रॅक्टर चालकाविरुद्ध तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मृत मजुराचे नाव विक्रमभाई रमनभाई खरडिया (वय २१, रा. काशेटा, जि. दाहोद, गुजरात) असे आहे. हा अपघात २३ जून रोजी घडला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विक्रमभाई खरडिया हे अन्य एका मजुरासह ट्रॅक्टरवर बसून वीटभट्टीवर कामासाठी जात होते. आव्हाणे गावाजवळ आल्यानंतर तोल जाऊन विक्रमभाई ट्रॅक्टरवरून खाली पडले. त्याचवेळी त्यांच्या अंगावरून ट्रॅक्टरचे चाक गेल्याने त्यांना गंभीर दुखापत झाली. या अपघातात त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला.
अपघातानंतर ट्रॅक्टर चालक संदीप सुरेश ढोले (रा. आव्हाणे, ता. जळगाव) हा ट्रॅक्टरसह घटनास्थळावरून पसार झाला असल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
याप्रकरणी वीटभट्टी चालक पद्माकर शिरसाठ यांनी दिलेल्या फिर्यादीवरून तालुका पोलिस ठाण्यात चालक संदीप ढोले याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक श्यामकुमार मोरे करीत आहेत.









