जळगाव (प्रतिनिधी) : जुन्या वादाच्या कारणावरून शहरातील पार्वतीबाई ओक नगर परिसरात दोन गटांमध्ये पुन्हा संघर्ष उफाळून आला. या वादात दोन्ही गटांनी एकमेकांवर दगडफेक व विळ्याने हल्ला केल्याने चार जण गंभीर जखमी झाले आहेत. याप्रकरणी दोन्ही गटांच्या फिर्यादीवरून शनिपेठ पोलिस ठाण्यात परस्परविरोधी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

आई व काकाला सोडविण्यास गेलेल्या तरुणावर हल्ला
नाशिक येथे शिक्षण घेत असलेला दुर्गेश चंद्रकांत सपकाळे (वय २२, रा. चौघुले प्लॉट, पार्वतीबाई ओक नगर) हा आईला भेटण्यासाठी जळगावला आला होता. २२ जून रोजी रात्री तो आजीच्या घरी जात असताना त्याचे काका शैलेंद्र सपकाळे आणि आई सुंदराबाई सोनवणे यांना मारहाण होत असल्याचे त्याला दिसले.
त्यांना सोडविण्यासाठी गेल्यानंतर दुर्गेश याच्या हाताच्या बोटावर विळ्याने वार करण्यात आला. तसेच त्याचा आत्याचा मुलगा मयूर सुखलाल साळुंखे यालाही विळा लागून दुखापत झाली. जखमींना उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
अवैध धंद्यांच्या तक्रारीचा राग
दुर्गेशचे काका शैलेंद्र सपकाळे हे माहिती अधिकार कार्यकर्ते असून त्यांनी परिसरातील कथित अवैध धंद्यांविरोधात जिल्हाधिकारी कार्यालयात तक्रार केली होती. त्याचाच राग मनात धरून मारहाण करण्यात आल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे. या प्रकरणी चेतन सोनार यांच्या वडिलांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दुपारच्या वादाचे रात्री रूपांतर हाणामारीत
दुसऱ्या बाजूने, पितांबर तुकाराम सोनार (वय ५२, रा. पार्वतीबाई ओक नगर) यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, त्यांच्या मुलाचा आणि शैलेंद्र सपकाळे यांचा दुपारी किरकोळ वाद झाला होता. त्याच कारणावरून रात्री शैलेंद्र सपकाळे, दुर्गेश सपकाळे आणि मयूर सपकाळे हे त्यांच्या घरासमोर आले आणि शिवीगाळ करू लागले.
वाद वाढल्यानंतर शैलेंद्र सपकाळे यांनी हातातील विळ्याने हल्ला केला, तर इतरांनी मारहाण केल्याचा आरोप करण्यात आला आहे.
डोक्यात विळ्याचा वार
फिर्यादीनुसार, शैलेंद्र सपकाळे यांनी पितांबर सोनार यांच्या डोक्यात विळ्याने वार करून त्यांना जखमी केले. तसेच घर जाळून टाकण्याची व जीवे मारण्याची धमकी दिल्याचेही नमूद करण्यात आले आहे.
या प्रकरणी शनिपेठ पोलिसांनी शैलेंद्र काशिनाथ सपकाळे, दुर्गेश चंद्रकांत सपकाळे आणि मयूर दीपक सपकाळे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, दोन्ही गुन्ह्यांचा पुढील तपास सुरू आहे.









