भाजपच्या कार्यकर्त्यांचा जिल्हाधिकारी कार्यालया जवळ जल्लोष
जळगाव (प्रतिनिधी) – जळगाव विधान परिषद निवडणुकीत महायुतीचे उमेदवार नंदकिशोर महाजन यांनी एकतर्फी विजय मिळवत महाविकास आघाडीचे उमेदवार शरद तायडे यांचा तब्बल ५८२ मतांनी पराभव केला. मतमोजणी पूर्ण झाल्यानंतर नंदकिशोर महाजन यांच्या विजयावर अधिकृत शिक्कामोर्तब झाले असून जिल्हाभर महायुतीच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष साजरा केला.

जिल्ह्यातील एकूण ६३० मतदारांपैकी ६१६ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता. जिल्हाधिकारी कार्यालयातील अल्पबचत भवन येथे कडेकोट पोलीस बंदोबस्तात आणि सीसीटीव्हीच्या निगराणीखाली मतमोजणी प्रक्रिया पार पडली. निकालाकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले होते.
मतमोजणीदरम्यान महाविकास आघाडीचे उमेदवार शरद तायडे यांनी काही वैध मते अवैध ठरवण्यात आल्याचा आरोप करत मतमोजणी प्रक्रियेवर आक्षेप नोंदविला. तसेच प्रशासन आणि भाजपमध्ये मिलीभगत असल्याचाही आरोप त्यांनी केला. मात्र सर्व हरकतींची छाननी करून मतमोजणी प्रक्रिया पूर्ण करण्यात आली.

अंतिम निकालात नंदकिशोर महाजन यांनी ५७७ मतांच्या मोठ्या फरकाने विजय मिळवत विधान परिषदेत दमदार प्रवेश केला. या निकालामुळे जळगाव जिल्ह्यात महायुतीचे राजकीय वर्चस्व पुन्हा एकदा अधोरेखित झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.
निकाल जाहीर होताच महायुतीच्या कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतषबाजी, मिठाई वाटप आणि घोषणाबाजी करत विजयाचा जल्लोष साजरा केला. जिल्ह्यातील विविध भागांत आनंदोत्सवाचे वातावरण पाहायला मिळाले. महाजन यांच्या विजयामुळे महायुतीच्या गोटात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून आगामी राजकीय समीकरणांवरही या निकालाचा परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.









