चोपडा (प्रतिनिधी) : चोपडा तालुक्यातील गौ-यापाडा गावातील शेतातून सोलर मोटार आणि वायर चोरीला गेल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी अज्ञात चोरट्याविरुद्ध चोपडा ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गौ-यापाडा येथील शेतकरी कैलास जामसिंग बारेला (वय ४२) यांनी आपल्या शेतातील विहिरीवर सिंचनासाठी रोटोमेक कंपनीची ५ एचपी क्षमतेची सोलर मोटार बसविली होती. तसेच सोलर मोटारीसाठी सुमारे २०० फूट लांबीची वायरही लावण्यात आली होती.
१३ जून २०२६ रोजी सायंकाळी ५ वाजेपासून ते १४ जून रोजी सकाळी ८.३० वाजेदरम्यान अज्ञात चोरट्यांनी शेतात प्रवेश करून सोलर मोटार आणि वायर चोरून नेली. चोरीस गेलेल्या ऐवजाची किंमत सुमारे १७ हजार रुपये असल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
या प्रकरणी कैलास बरेला यांच्या फिर्यादीवरून चोपडा ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ११९/२०२६ दाखल करण्यात आला आहे. भारतीय न्याय संहिता कलम ३०३(२) अन्वये अज्ञात आरोपीविरुद्ध चोरीचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस हवालदार गणेश मधुकर पाटील करीत आहेत. अद्याप आरोपींचा शोध सुरू असून कोणालाही अटक करण्यात आलेली नाही.








