जळगाव (प्रतिनिधी) : वाहनातून येणाऱ्या दुर्गंधीबाबत जाब विचारल्याचा राग मनात धरून सहा जणांनी दोन व्यक्तींवर लोखंडी रॉड व लाकडी दांडक्याने हल्ला केल्याची घटना जळगाव शहरातील कानळदा रोड परिसरात घडली. या प्रकरणी जळगाव शहर पोलीस ठाण्यात सहा जणांविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, १८ जून रोजी दुपारी साडेबारा ते एक वाजेच्या सुमारास कानळदा रोडवरील राधा रमण अपार्टमेंटजवळ ही घटना घडली. फिर्यादी योगेश गोपाळ साळी (वय ३८, व्यवसाय हॉटेल चालक, रा. हरिओम नगर, कानळदा रोड, जळगाव) हे परिसरात असताना आरोपींच्या मालवाहू वाहनातून दुर्गंधी येत असल्याने त्यांनी वाहनात काय आहे, अशी विचारणा केली.
या प्रश्नाचा राग आल्याने आरोपींनी फिर्यादी व त्यांच्यासोबत असलेल्या राहुल सोनवणे यांच्याशी वाद घालत शिवीगाळ केली. त्यानंतर आरोपींनी इतर साथीदारांना बोलावून घेत राहुल सोनवणे यांच्यावर लोखंडी रॉडने हल्ला करून गंभीर दुखापत केल्याचा आरोप आहे.
फिर्यादी योगेश साळी यांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला असता त्यांनाही मारहाण करण्यात आली. आरोपींनी लाकडी दांडक्याने डोके, हात व पायावर वार करून दुखापत केल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
या प्रकरणी समशेर खान, त्याचा भाऊ, दोन मुलगे तसेच अन्य दोन अनोळखी इसम अशा सहा जणांविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नसून पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरेश आव्हाड करीत आहेत.









