बेल्जियन मालिनोज जातीच्या श्वानाला नऊ महिन्यांचे विशेष प्रशिक्षण
जळगाव (प्रतिनिधी) :- जळगाव जिल्हा पोलिस दलातील ‘धुरंधर’ या बेल्जियन मालिनोज जातीच्या श्वानाला गुन्हे शोधक (ट्रॅकर) म्हणून तयार करण्यासाठी हरियाणातील पंचकुला येथे विशेष प्रशिक्षणासाठी रवाना करण्यात आले आहे. अवघ्या सात महिने नऊ दिवस वयाच्या धुरंधरकडून भविष्यात गुन्हे उघडकीस आणण्यासाठी महत्त्वपूर्ण योगदानाची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.


धुरंधरचा जन्म १० नोव्हेंबर २०२५ रोजी झाला असून त्याला इंडो-तिबेटन बॉर्डर पोलीस (ITBP) च्या हरियाणातील पंचकुला येथील ‘नॅशनल ट्रेनिंग सेंटर फॉर डॉग्ज अँड ॲनिमल्स’ (NTCD&A) मध्ये नऊ महिन्यांचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. देशातील अग्रगण्य श्वान प्रशिक्षण केंद्र म्हणून या संस्थेची ओळख आहे.
प्रशिक्षणाच्या पहिल्या तीन महिन्यांत धुरंधरला ‘ओबिडीयन्स’ अर्थात आज्ञाधारकतेचे प्रशिक्षण दिले जाईल. त्यानंतरच्या सहा महिन्यांत विविध वास ओळखणे, ट्रॅक काढणे, ओळख परेड, ड्रॉप अँड फाइंड यासह गुन्हे शोधण्यासाठी आवश्यक असलेल्या तांत्रिक कौशल्यांचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. धुरंधरसोबत प्रथम हस्तक म्हणून हेड कॉन्स्टेबल भट्टू पाटील तर द्वितीय हस्तक म्हणून पोलीस कॉन्स्टेबल हंसराज देशमुख यांची नियुक्ती करण्यात आली आहे. प्रशिक्षणादरम्यान हे दोन्ही हस्तक श्वानासोबत राहून त्याच्या कौशल्य विकासात महत्त्वाची भूमिका बजावणार आहेत.
पंचकुला येथील केंद्रात बॉम्ब शोधक, अंमली पदार्थ शोधक, ट्रॅकिंग, दहशतवादविरोधी कारवाया तसेच वन्यजीव तस्करीविरोधी मोहिमांसाठी श्वानांना विशेष प्रशिक्षण दिले जाते. या केंद्रातून प्रशिक्षित झालेले श्वान देशातील विविध सुरक्षा दलांमध्ये उल्लेखनीय कामगिरी बजावत आहेत. “गुन्ह्यांचा माग काढणे, पुरावे शोधणे आणि तपासाला दिशा देणे यासाठी प्रशिक्षित श्वान पोलिस दलाची मोठी ताकद ठरतात. ‘धुरंधर’ही भविष्यात जळगाव पोलिस दलाचा विश्वासू आणि सक्षम सहकारी ठरेल, अशी अपेक्षा आहे.”









