बकऱ्या शेतात शिरल्याच्या कारणावरून हाणामारी; चौघांविरुद्ध गुन्हा दाखल, एकावर उपचार सुरू
चोपडा, (प्रतिनिधी) :- चोपडा तालुक्यातील शिवारात पपई पिकाचे नुकसान झाल्याच्या कारणावरून झालेल्या वादातून ६० वर्षीय शेतकरी आणि त्यांच्या मुलाला लाकडी दांडक्याने व लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यात आल्याची घटना घडली. याप्रकरणी चोपडा शहर पोलीस ठाण्यात चौघांविरुद्ध मारहाण, शिवीगाळ व जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चोपडा शिवारातील गट क्रमांक ३९४ व ३९५ मधील शेतात १७ जून रोजी दुपारी साडेदोन ते तीन वाजेच्या सुमारास हा प्रकार घडला. जोगीलाल शंकर पारधी (वय ६०, रा. रामपुरा, चोपडा) हे दिलीप विश्वम चव्हाण यांच्या शेतात निमबटाईने शेती करतात. त्यांनी शेतात पपईचे पीक घेतले असून घटनेच्या दिवशी काही बकऱ्या शेतात शिरल्याने पिकाचे तसेच ठिबक सिंचनाच्या नळ्यांचे नुकसान झाल्याचा आरोप करण्यात आला आहे.
नुकसान झाल्यानंतर संबंधित बकऱ्या पीक संरक्षण सोसायटीमध्ये नेण्याचा निर्णय घेतल्याने वाद निर्माण झाला. याचा राग आल्याने आरोपींनी फिर्यादी व त्यांच्या मुलाला अडवून मारहाण केल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
फिर्यादीनुसार, पवन सिताराम पारधी याने लाकडी दांडक्याने जोगीलाल पारधी यांच्या डोक्यावर व छातीवर वार केले. तर निलेश बापू भालेराव, विक्की अशोक पारधी आणि मयुर यादव सोनार यांनी लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. तसेच अश्लील शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिल्याचाही आरोप करण्यात आला आहे.
या घटनेत दीपक जोगीलाल पारधी हे जखमी झाले असून त्यांच्यावर चोपडा येथील हरताळकर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. जोगीलाल पारधी यांच्या फिर्यादीवरून चोपडा शहर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमान्वये चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक पवन देसले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सचिन चौधरी करीत असून पोलिसांकडून पुढील चौकशी सुरू आहे. पिकाच्या नुकसानीवरून सुरू झालेल्या वादाने हिंसक वळण घेतल्याने परिसरात या घटनेची चर्चा सुरू आहे.








