चोपडा शहरातील घटना; आठ वर्षांच्या प्रेमसंबंधानंतर लग्नास नकार
चोपडा (प्रतिनिधी) : लग्नाचे आमिष दाखवून तरुणीशी वारंवार शारीरिक संबंध ठेवत अखेर लग्नास नकार दिल्याप्रकरणी एका तरुणाविरुद्ध चोपडा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, चोपडा शहरातील एका परिसरात राहणाऱ्या 24 वर्षीय तरुणीने याबाबत फिर्याद दिली आहे. फिर्यादी आणि संशयित सईद सय्यद असद (वय 26,चोपडा) हे एकाच परिसरात राहत असल्याने त्यांच्यात परिचय होता. गेल्या आठ वर्षांपासून दोघांमध्ये प्रेमसंबंध होते.
फिर्यादीनुसार, संशयिताने लग्नाचे आश्वासन देत वेळोवेळी तिच्याशी शारीरिक संबंध ठेवले. दरम्यान, 1 जून रोजी लग्न ठरलेले असतानाही समाजाच्या बैठकीत लग्नास नकार देत तिची फसवणूक केल्याचा आरोप करण्यात आला आहे.
या प्रकरणी तरुणीच्या तक्रारीवरून चोपडा शहर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (BNS) कलम 69, 352, 351(2) आणि 318(2) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक चेतन परदेशी करीत आहेत. पोलिसांनी संशयिताला ताब्यात घेतल्याची माहिती मिळाली आहे.









