जामनेर तालुक्यातील घटना ; सासरच्या मंडळींविरुद्ध गुन्हा दाखल
जामनेर (प्रतिनिधी): तालुक्यातील खादगाव येथे कौटुंबिक वादातून विवाहितेचे तिच्याच माहेरच्या (सासरच्या) लोकांकडून स्कोर्पिओ गाडीतून अपहरण केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. यात सोडवासोडव करणाऱ्या जावयावर तीक्ष्ण हत्याराने वार करून जखमी करण्यात आले असून, कुटुंबातील इतर महिलांना मारहाण करत बंदुकीच्या गोळीने मारण्याची धमकी देण्यात आली आहे. याप्रकरणी जामनेर पोलीस ठाण्यात मुलीच्या वडिलांसह सासरच्या ४ जणांवर विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, खादगाव (ता. जामनेर) येथील रहिवासी शुभम ज्ञानेश्वर सोनवणे (वय २९, व्यवसाय- मजुरी) यांचा विवाह पायल यांच्याशी झालेला आहे. ११ जून २०२६ रोजी सकाळी ०६:३० वाजेच्या सुमारास शुभम हे त्यांच्या घरी असताना, त्यांची पत्नी पायल हिचे माहेरचे लोक त्या ठिकाणी आले. त्यांनी जुन्या वादावरून थेट शुभम यांच्या पोटात लाथा मारण्यास सुरुवात केली आणि पत्नी पायल हिला देखील बेदम मारहाण केली. संशयितांनी पायल हिचे हात-पाय पकडून तिला घरातून ओढत बाहेर नेले.
शुभम यांनी आपल्या पत्नीला संशयितांच्या तावडीतून सोडवण्याचा आटोकाट प्रयत्न केला. मात्र, संशयित सासरे ओमप्रकाश पटेल याने त्याच्या हातातील तीक्ष्ण हत्याराने जावई शुभम यांच्या उजव्या हातावर सपासप वार करून त्यांना गंभीर जखमी केले. त्यानंतर संशयितांनी पायल हिला बळजबरीने ‘स्कॉर्पिओ’ गाडीत टाकून तिचे अपहरण करून नेले.
हा गोंधळ सुरू असताना शुभम यांची बहीण शितल प्रविण चव्हाण आणि आई सुरेखा सोनवणे या सोडवासोडव करण्यासाठी मध्यस्थी करत होत्या. मात्र संशयितांनी त्यांनाही चापटबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. तसेच संशयितांनी “तुम्हाला बंदुकीच्या गोळीने मारून टाकू,” अशी थेट जीवे मारण्याची धमकी दिली आणि बहिणीच्या गळ्यातील मंगळसूत्र तोडून फेकून दिले. या धावपळीत शुभम हे मदतीसाठी आरडाओरडा करत असताना, संशयितांनी त्यांचा जवळ असलेला ‘रेडमी नोट १० प्रो’ कंपनीचा मोबाईल हिसकावून घेतला आणि ते भुसावळच्या दिशेने फरार झाले.
या धक्कादायक प्रसंगानंतर जखमी शुभम सोनवणे यांनी ११ जून रोजी संध्याकाळी १६:५७ वाजता जामनेर पोलीस ठाणे गाठून फिर्याद दिली. त्यानुसार पोलिसांनी संशयित आरोपी:ओमप्रकाश धनराज पटेल (सासरे),,फिर्यादीचे मामासासरे (पूर्ण नाव माहीत नाही), सुरज ओमप्रकाश पटेल, सुरेश पटेल (पूर्ण नाव माहीत नाही) (सर्व राहणार: वाणी, जि. यवतमाळ) या चौघांविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) नुसार कलम १३८ (अपहरण), ११८(१) (घातक शस्त्राने दुखापत करणे), ११५(२), ३५२ आणि ३५१(२) अन्वये गुन्हा दाखल केला आहे.
या गंभीर घटनेची माहिती मिळताच जामनेर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मुरलीधर कासार यांनी तातडीने चक्र फिरवली आहेत. या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक फौजदार सुनील जोशी करत आहे.








