सांगाडा तपासणीसाठी धुळ्याला रवाना; धरणगाव तालुक्यातील रेल येथील घटना
धरणगाव (प्रतिनिधी) : तालुक्यातील रेल येथील १२ वर्षीय गणेश पाटील या मुलाच्या संशयास्पद मृत्यूप्रकरणी पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली असून, अडीच महिन्यांपूर्वी दफन करण्यात आलेला मृतदेह न्यायालयाच्या परवानगीनंतर बाहेर काढण्यात आला. पुढील तपासासाठी सांगाडा फॉरेन्सिक तपासणीसाठी धुळे येथे पाठविण्यात आला आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, गणेश पाटील हा रेल येथील परिसरातील क्रिकेटप्रेमी मुलगा होता. मोकळ्या मैदानावर सायंकाळी सुरू असलेल्या क्रिकेट सामन्यादरम्यान तो अचानक खाली पडल्याची घटना घडली होती. त्यानंतर त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले; मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला होता. घटनेनंतर कुटुंबीयांनी मृत्यूबाबत संशय व्यक्त केला होता.
मुलाच्या मृत्यूनंतर गावात विविध चर्चांना उधाण आले होते. काही ग्रामस्थांनी हा मृत्यू नैसर्गिक नसून घातपातामुळे झाला असावा, असा संशय व्यक्त केला. त्यानंतर मुलाचे वडील नवल पाटील यांनी पोलिसांकडे तक्रार दाखल करून सखोल चौकशीची मागणी केली होती.
तक्रारीची दखल घेत पोलिसांनी तपास सुरू केला. न्यायालयाची परवानगी मिळाल्यानंतर महसूल आणि आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत दफनभूमीतून मृतदेह बाहेर काढण्यात आला. मृतदेहाचे अवशेष व सांगाडा जप्त करून पुढील वैज्ञानिक तपासणीसाठी धुळे येथील फॉरेन्सिक प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहेत.
फॉरेन्सिक तपासणीचा अहवाल आल्यानंतर मुलाच्या मृत्यूमागील नेमके कारण स्पष्ट होण्याची शक्यता आहे. या प्रकरणात पोलिसांकडून सर्व बाजूंनी तपास सुरू असून, अहवालाच्या आधारे पुढील कायदेशीर कारवाई केली जाणार असल्याची माहिती अधिकृत सूत्रांनी दिली. दरम्यान, या घटनेमुळे रेल गावासह परिसरात खळबळ उडाली असून, फॉरेन्सिक अहवालाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.









