हिरापूर शिवारातील घटना; अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल
चाळीसगाव (प्रतिनिधी) : तालुक्यातील हिरापूर शिवारात अज्ञात व्यक्तीने शेतातील ठिबक सिंचन यंत्रणेची तोडफोड केल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकारात सुमारे ३ लाख २ हजार रुपयांचे नुकसान झाले असून, चाळीसगाव ग्रामीण पोलिस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हिरापूर येथील भूषण बाबूलाल छाजेड (वय ३८) यांचे गट क्रमांक ३२३/१ मधील शेत तसेच त्यांच्या पत्नीच्या गट क्रमांक ३२३/२ मधील शेतात ठिबक सिंचन व्यवस्था बसविण्यात आली होती. ३० मे रोजी सकाळी १० ते ३१ मे रोजी सकाळी ९.३० या कालावधीत अज्ञात व्यक्तीने शेतात प्रवेश करून ठिबक सिंचनाच्या लाईनची तोडफोड केली तसेच फिल्टरचेही नुकसान केले.
या तोडफोडीमुळे शेतकऱ्याचे मोठे आर्थिक नुकसान झाले असून, सिंचन व्यवस्थेवर परिणाम झाला आहे. घटनेची माहिती मिळाल्यानंतर भूषण छाजेड यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली.
याप्रकरणी भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ३२६(फ) व ३२४(४) अन्वये चाळीसगाव ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेचा पुढील तपास पोहेकॉ. तुकाराम चव्हाण करीत आहेत.
शेतीसाठी अत्यावश्यक असलेल्या ठिबक सिंचन यंत्रणेची जाणीवपूर्वक तोडफोड केल्याने परिसरातील शेतकऱ्यांमध्ये संताप व्यक्त होत असून, आरोपींचा तातडीने शोध घेण्याची मागणी होत आहे.









