जामनेर शहरातील धक्कादायक घटना; मोटारसायकलच्या डिकीत ठेवलेली रक्कम अज्ञात चोरट्यांनी लंपास
जामनेर (प्रतिनिधी) :- जामनेर शहरातील गांधी चौक परिसरात भरदिवसा मोटारसायकलच्या डिकीत ठेवलेली तब्बल दोन लाख रुपयांची रोकड अज्ञात चोरट्यांनी लंपास केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी जामनेर पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी तपास सुरू केला आहे.


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सय्यद नजाकत अली (वय ३२, रा. हाजी बशीर नगर, जामनेर) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. ३० मे २०२६ रोजी दुपारी सुमारे ३ वाजेच्या सुमारास गांधी चौक येथील ताज ज्यूस सेंटरसमोर त्यांनी आपली मोटारसायकल (क्र. MH-19-BS-1107) उभी केली होती.
यावेळी मोटारसायकलच्या डिकीत शंभर रुपयांच्या नोटांची २० बंडले, म्हणजेच एकूण दोन लाख रुपयांची रोकड ठेवण्यात आली होती. याच संधीचा फायदा घेत अज्ञात चोरट्याने डिकीतून ही रक्कम चोरून नेल्याचे फिर्यादीने तक्रारीत नमूद केले आहे.
या प्रकरणी जामनेर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ३०३(२) अंतर्गत चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेनंतर परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी सुरू असून चोरट्याचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी पथके नियुक्त केली आहेत.
या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस कर्मचारी गजानन काळे करीत असून, अज्ञात आरोपीचा शोध सुरू आहे. भरदिवसा शहराच्या मध्यवर्ती भागात घडलेल्या या घटनेमुळे व्यापारी आणि नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.








