दोन ब्रास वाळूसह डंपर जप्त; २.६१ लाखांचा मुद्देमाल ताब्यात, चालकाविरुद्ध गुन्हा
जळगाव (प्रतिनिधी) :- शहरातील चित्रा चौक परिसरात अवैधरीत्या वाळूची वाहतूक करणाऱ्या डंपरवर जळगाव शहर पोलिसांनी धडक कारवाई केली. या कारवाईत दोन ब्रास वाळू आणि डंपरसह एकूण २ लाख ६१ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ३१ मे रोजी पहाटे सुमारे ३.०५ वाजेच्या सुमारास चित्रा चौक परिसरात गस्तीदरम्यान संशयास्पद डंपरची तपासणी करण्यात आली. तपासणीअंती संबंधित डंपरमध्ये अवैधरित्या वाहतूक केली जात असलेली दोन ब्रास वाळू आढळून आली.
या प्रकरणात चंदू इकबाल शहा (वय २३, रा. खेडी आव्हाणा, ता. जि. जळगाव) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संबंधित चालकाकडे वाळू वाहतुकीसाठी आवश्यक शासकीय परवाना अथवा वैध कागदपत्रे नसल्याचे तपासात समोर आले. शासनाचा महसूल बुडवून वाळूची चोरी करून वाहतूक केली जात असल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे.
कारवाईदरम्यान पोलिसांनी सुमारे ११ हजार रुपये किमतीची दोन ब्रास वाळू तसेच २ लाख ५० हजार रुपये किमतीचा डंपर (एमएच-१९ पीडी-४१००) जप्त केला. जप्त मुद्देमालाची एकूण किंमत २ लाख ६१ हजार रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले.
या प्रकरणी भारतीय न्याय संहिता कलम ३०३(२) तसेच महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियमाच्या संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस निरीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.
अवैध गौण खनिज वाहतुकीविरोधात पोलिसांनी कठोर भूमिका घेतली असून अशा कारवाया पुढेही सुरू राहणार असल्याचा इशारा प्रशासनाने दिला आहे.









