गिरणा नदीपात्रालगत १२ हजार रुपयांचा वाळू साठा लंपास; एरंडोल पोलिसांत गुन्हा दाखल
एरंडोल (प्रतिनिधी) :- तालुक्यातील नागदुली शिवारात गिरणा नदीपात्रालगत साठवून ठेवलेली वाळू अज्ञात चोरट्यांनी लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी एरंडोल पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी तपास सुरू केला आहे.


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नागदुली शिवारातील गिरणा नदीपात्रालगत सुमारे १०० मीटर अंतरावर मोकळ्या जागेत ठेवण्यात आलेल्या दोन ब्रास वाळूच्या साठ्यावर चोरट्यांनी डल्ला मारला. चोरीस गेलेल्या वाळूची अंदाजे किंमत १२ हजार रुपये असल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
याप्रकरणी पो.हे.कॉ. महेंद्रसिंग उदेसिंग पाटील (वय ४९), रा. एरंडोल यांनी फिर्याद दिली आहे. २९ मे रोजी दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास ही बाब निदर्शनास आल्यानंतर पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली.
अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा
फिर्यादीनुसार, अज्ञात व्यक्तीने स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी वाळूचा साठा चोरून नेला. या प्रकरणी भारतीय न्याय संहितेच्या कलम ३०३(२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस तपास सुरू
या गुन्ह्याचा पुढील तपास एरंडोल पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी स.फो.राजेश पाटील करीत असून, चोरी करणाऱ्या अज्ञात आरोपीचा शोध सुरू आहे. अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही.









