सुनसगाव-बेलव्हाळ चौफुलीवरील अपघाताने हळहळ; गतीरोधकांच्या मागणीला पुन्हा जोर
भुसावळ ( प्रतिनिधी ) – तालुक्यातील सुनसगाव ते बेलव्हाळ चौफुली परिसरात गुरुवार, २८ मे रोजी दुपारी झालेल्या भीषण अपघातात एका महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला असून तिचे पती गंभीर जखमी झाले आहेत. भरधाव वेगाने येणाऱ्या ओमनी वाहनाने अॅक्टिव्हा दुचाकीला समोरासमोर जोरदार धडक दिल्याने हा अपघात घडला. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.


पापड व्यवसाय करून घरी परतताना दुर्घटना
वराडसिम येथील आरती उमाकांत भारंबे (वय ४०) या पती उमाकांत भारंबे यांच्यासोबत खेडी (जळगाव) येथून पापड तयार करून अॅक्टिव्हा (एमएच १९ डीआर ३२४१) दुचाकीने घरी परतत होत्या. सुनसगाव मार्गे बेलव्हाळ फाट्याकडून वराडसिमकडे जात असताना दुपारी साडेदोन वाजेच्या सुमारास गोजोरे गावाकडून नशिराबादच्या दिशेने भरधाव येणाऱ्या ओमनी (एमएच ०४ ईडी ५६२) वाहनाने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली.
नागरिकांची तत्पर मदत; उपचारादरम्यान मृत्यू
अपघात इतका भीषण होता की पती-पत्नी दोघेही गंभीर जखमी झाले. घटनेनंतर परिसरातील नागरिकांनी तत्काळ मदतीसाठी धाव घेतली. उपसरपंच एकनाथ सपकाळे, राहुल नारखेडे तसेच मंदाबाई भय्या कोळी यांनी जखमी दाम्पत्याला रिक्षाने जळगाव येथील सामान्य रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचार सुरू असताना गंभीर दुखापतीमुळे आरती भारंबे यांचा मृत्यू झाला. उमाकांत भारंबे यांच्यावर अद्याप उपचार सुरू आहेत.
पोलिसांनी घटनास्थळी केली पाहणी
अपघातानंतर ओमनी चालक घटनास्थळावरून निघून गेल्याची माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली. संबंधित वाहन मलकापूरहून नंदुरबारकडे जात असल्याचे सांगितले जात आहे. घटनेची माहिती मिळताच सुनसगावचे पोलीस पाटील खुशाल पाटील यांनी भुसावळ तालुका पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर पोलीस निरीक्षक महेश गायकवाड, पोलीस उपनिरीक्षक संजय कंखरे व पोलीस हेड कॉन्स्टेबल धिरज मंडलिक यांनी घटनास्थळी भेट देत पाहणी केली. दोन्ही अपघातग्रस्त वाहने पोलिस ठाण्यात जमा करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.
चौफुलीवर गतीरोधकांची मागणी
नशिराबाद ते बोदवड रस्त्याचे रुंदीकरण झाल्यानंतर या मार्गावर अवजड वाहनांची मोठी वर्दळ वाढली आहे. त्यामुळे वाहनांचा वेग नियंत्रणाबाहेर जात असून अपघातांच्या घटनाही वाढत असल्याची नागरिकांची तक्रार आहे. सुनसगाव-बेलव्हाळ चौफुलीवर दोन्ही बाजूंनी गतीरोधक बसवावेत तसेच पुलाला संरक्षक कठडे उभारावेत, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते जितेंद्र काटे यांनी प्रशासनाकडे केली आहे.









