महसूल विभाग आणि पोलिस प्रशासनाने संयुक्त कारवाई
अमळनेर प्रतिनिधी):- तालुक्यातील सावखेडा गावाजवळ तापी नदी पात्राच्या परिसरात अवैधरित्या साठवून ठेवलेल्या डिझेलच्या साठ्यावर महसूल विभाग आणि पोलिस प्रशासनाने संयुक्त कारवाई केली आहे. या कारवाईत सुमारे १ लाख ५५ हजार रुपये किमतीचे १,४७० लिटर डिझेल जप्त करण्यात आले असून, संशयित आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


२७ मे २०२६ रोजी दुपारी ३.३० वाजेच्या सुमारास महसूल व पोलिस विभागाचे संयुक्त पथक सावखेडा येथील तापी नदीकाठावरील वाळू डेपो परिसरात दाखल झाले. या पथकात उपविभागीय दंडाधिकारी मयूर शिंगळे, तहसीलदार सुराणा, उपविभागीय पोलिस अधिकारी (चोपडा विभाग), पोलिस निरीक्षक दत्तात्रय निकम, मंडळ अधिकारी कल्याणी पाटील आणि ग्राम महसूल अधिकारी पवन शिंगारे यांचा समावेश होता.
पथकाने वाळू डेपो परिसराची कसून तपासणी केली असता, तेथे प्लास्टिकच्या ड्रममध्ये मोठ्या प्रमाणावर डिझेल लपवून ठेवल्याचे उघड झाले. पंचांसमक्ष केलेल्या पंचनाम्यात साठा जप्त करण्यात आला.
एकूण जप्त मुद्देमाल: १,४७० लिटर डिझेल (एकूण किंमत ₹१,५५,०४०/-) असा आहे. कारवाईदरम्यान घटनास्थळी काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांकडे चौकशी केली असता, हा डिझेल साठा अमळनेर येथील गिरीश तुलशीदास बेलदार यांच्या मालकीचा असल्याचे समोर आले. प्राथमिक तपासात हा साठा पूर्णपणे बेकायदेशीर असल्याचे निष्पन्न झाले आहे. महसूल विभागाने मुद्देमाल जप्त करून पुढील कारवाईसाठी अमळनेर पोलिस स्टेशनच्या ताब्यात दिला आहे.
जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचे उल्लंघन करून बेकायदेशीर साठवणूक केल्याप्रकरणी संशयित आरोपी गिरीश बेलदार विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रशासनाने या कारवाईच्या माध्यमातून अवैध इंधन साठवणूक, काळाबाजार आणि वाळू व्यवसायाशी संबंधित गैरप्रकार करणाऱ्यांना कडक इशारा दिला असून, आगामी काळातही अशीच तीव्र मोहीम सुरू राहील, असे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.









