बसमध्ये चढत असताना अज्ञात चोरट्याने साधला डाव; बाजारपेठ पोलिसांत गुन्हा दाखल
भुसावळ ( प्रतिनिधी ) – भुसावळ येथील बसस्थानक परिसरात बसमध्ये चढत असताना प्रवाशाच्या खिशातून तब्बल ४९ हजार रुपये किमतीचा मोबाईल चोरीला गेल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरोधात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अमोल विश्वास श्रावगी (वय ४७, रा. साकेत पॅराडाईज, आधारवाडी, कल्याण पश्चिम, जि. ठाणे) हे २१ मे रोजी पहाटे सुमारे ५.४५ वाजेच्या सुमारास भुसावळ बसस्थानकात बसमध्ये चढत होते. त्यावेळी गर्दीचा फायदा घेत अज्ञात चोरट्याने त्यांच्या खिशातून मोबाईल फोन चोरून नेला.
चोरीला गेलेला मोबाईल हा ‘वन प्लस 13R’ कंपनीचा निळ्या रंगाचा असून त्याची किंमत सुमारे ४९ हजार रुपये असल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. मोबाईलमध्ये दोन सिमकार्ड देखील होते.
या घटनेप्रकरणी भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम ३०३(२) प्रमाणे चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेची नोंद २१ मे रोजी दुपारी २.३५ वाजता करण्यात आली.
या प्रकरणाचा तपास पोलीस कर्मचारी श्रीकृष्ण पाटील करीत असून अज्ञात चोरट्याचा शोध सुरू आहे. बसस्थानक परिसरातील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिसांकडून तपास सुरू करण्यात आला आहे.
बसस्थानक परिसरात वाढत्या चोरीच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी प्रवाशांना आपल्या मौल्यवान वस्तू आणि मोबाईल सुरक्षित ठेवण्याचे आवाहन केले आहे.









