जळगाव (प्रतिनिधी):- अवैध सावकारी प्रकरणी अनुकूल अहवाल पाठवण्यासाठी आणि पुढील सुनावणीची तारीख देण्यासाठी तब्बल ५ लाख रुपयांची लाच मागून, तडजोडीअंती पहिला हप्ता म्हणून १ लाख ५० हजार रुपयांची लाच स्वीकारताना जळगाव येथील उपनिबंधक (सहकार खाते, वर्ग-१) जगदीश बाबूराव बारी आणि त्यांच्या सांगण्यावरून लाच स्वीकारणारा खाजगी इसम देविदास धनसिंग पाटील यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) रंगेहात पकडले. या धडक कारवाईमुळे जळगावच्या सहकार क्षेत्रात आणि शासकीय वर्तुळात प्रचंड खळबळबळ उडाली आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, तक्रारदार यांच्यावर अवैध सावकारी धंदा कारवाईच्या अनुषंगाने उपनिबंधक, सहकारी संस्था, जळगाव तालुका कार्यालयात सुनावणी सुरू होती. तक्रारदार हे त्यांच्याविरुद्ध सुरू असलेल्या अवैध सावकारी चौकशी प्रकरणी विवारपूस करण्यासाठी व पुढील सुनावणीची तारीख विचारण्यासाठी उपनिबंधक कार्यालयात गेले होते. यावेळी उपनिबंधक जगदीश बाबूराव बारी (वय ५६, रा. शांतीनगर, यावल रोड, भुसावळ) यांनी तक्रारदार व त्यांच्या पत्नीविरुद्ध गुन्हा दाखल होऊ नये, म्हणून अवैध सावकारी बाबतचा चौकशी अहवाल अनुकूल पाठवण्यासाठी सुरुवातीला ५ लाख रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. तक्रारदार यांची लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी १८ मे २०२६ रोजी ला.प्र.वि. जळगाव घटकाकडे रीतसर तक्रार नोंदवली होती.
तक्रारदार यांच्या तक्रारीच्या अनुषंगाने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने १८ मे रोजीच पंचांसमक्ष लाचेच्या मागणीची पडताळणी केली. या पडताळणी दरम्यान उपनिबंधक जगदीश बारी यांनी तक्रारदार यांच्याकडे अनुकूल अहवालासाठी ५ लाख रुपयांची मागणी करून तडजोडीअंती ३ लाख रुपये देण्याचे ठरवले. तसेच पडताळणी दरम्यान बारी यांनी तक्रारदार यांना सांगितले की, “तुम्ही मागच्या प्रकरणाच्या वेळेस वकील लावला म्हणून आमचे खूप मोठे नुकसान केले, म्हणून नकारात्मक अहवाल दिला होता. परंतु आता अनुकूल अहवाल पाठवितो.” असे सांगून लाचेच्या एकूण रकमेपैकी पहिला हप्ता म्हणून १ लाख ५० हजार रुपये आरोपी नामे देविदास धनसिंग पाटील (वय ४४ वर्ष, मानद कार्यकारी अधिकारी, जळगाव जिल्हा बँक असोसिएशन, रा. भुरे मामलेदार प्लॉट, शिवाजीनगर, जळगाव – खाजगी इसम) यांच्याकडे आज, दिनांक २० मे २०२६ रोजी देण्यास सांगितले.
त्यानुसार आज दि. २० मे २०२६ रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने जळगाव जिल्हा अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक्स असोसिएशन लि., बी.जे. मार्केट येथील तिसऱ्या मजल्यावर सापळा रचला. तक्रारदार यांच्याकडून लाचेचा पहिला हप्ता म्हणून १ लाख ५० हजार रुपयांची रोकड स्वीकारताना आरोपी क्र. २ देविदास पाटील याला पथकाने रंगेहात पकडले. या प्रकरणी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम, १९८८ चे कलम ७ व १२ प्रमाणे गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया सुरू आहे.
सदरची धडक कारवाई नाशिक परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक भारत तांगडे, अप्पर पोलीस अधीक्षक माधव रेड्डी, सुनील दोरगे यांच्या मार्गदर्शनाखाली, ला.प्र.वि. जळगावचे पोलीस उप अधीक्षक योगेश ठाकूर यांच्या पर्यवेक्षणात सापळा अधिकारी पोलीस निरीक्षक रेश्मा अवतारे, तसेच सापळा पथकातील पोलीस अंमलदार हेमंत नागरे, बाळू मराठे, संगीता पवार, मनोज पाटील आणि सचिन चाटे यांच्या पथकाने यशस्वीरित्या पार पाडली. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक श्रीमती स्मिता नवघरे करत आहेत.










