जळगाव (प्रतिनिधी) :- जळगाव जिल्हा स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषद निवडणुकीची रणधुमाळी आता खऱ्या अर्थाने सुरू झाली असून, दिनांक 25 मे ते 22 जून असा निवडणूक कार्यक्रम घोषित करण्यात आला आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळातील घडामोडींना कमालीचा वेग आला आहे. या निवडणुकीत महायुतीमधील जागावाटपाचा तिढा वरिष्ठ पातळीवर सुटण्याची चिन्हे असतानाच, जळगावच्या जागेसाठी शिवसेना (शिंदे गट) कडून एक उमदे आणि आश्वासक नेतृत्व म्हणून माजी जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव गुलाबराव पाटील यांचे नाव अत्यंत जोमाने चर्चेत आले आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांचे चिरंजीव असलेले प्रतापराव पाटील यांची उमेदवारी जवळपास निश्चित मानली जात आहे.

वरिष्ठ पातळीवरील ‘बदलाचे’ वारे: जळगाव शिंदे गटाला मिळणार?
सध्या ही जागा भारतीय जनता पक्षाच्या ताब्यात असली, तरी महायुतीच्या जागावाटपात वरिष्ठ पातळीवर एका वेगळ्याच समीकरणाची चर्चा सुरू आहे. प्राथमिक माहितीनुसार, परभणीची जागा शिंदे गटाने भाजपसाठी सोडावी आणि त्या बदल्यात भाजपचा बालेकिल्ला असलेली जळगावची जागा शिवसेना शिंदे गटाला बहाल करावी, अशी रणनीती आखली जात आहे. जर हा ‘फॉर्म्युला’ ठरला, तर शिंदे गटाकडून एकमेव आणि तगडे उमेदवार म्हणून प्रताप गुलाबराव पाटील यांचे नाव मैदानात असणार आहे.
प्रतापराव पाटील यांच्या उमेदवारीच्या जमेच्या बाजू
राजकीय वारसा आणि जनसंपर्क: प्रतापराव पाटील यांना वडिलांकडून (ना.गुलाबराव पाटील) आक्रमक आणि लोकसंग्रही राजकारणाचा मोठा वारसा लाभला आहे. जळगाव जिल्ह्यातील ग्रामीण भागातील नाडी त्यांना अचूक ठाऊक आहे. केवळ ‘मंत्र्यांचे पुत्र’ हीच त्यांची ओळख नसून, त्यांनी यापूर्वी जिल्हा परिषद सदस्य म्हणून काम केले आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या कारभाराचा आणि बजेटचा त्यांना दांडगा अनुभव आहे. ही निवडणूक स्थानिक स्वराज्य संस्थांच्या (नगरसेवक, जिल्हा परिषद, पंचायत समिती सदस्य) मतदारांची असल्याने प्रतापराव पाटील यांचा हा अनुभव उमेदवारीसाठी हुकुमी एक्का ठरणार आहे. व जिल्ह्यातील तरुण वर्गामध्ये आणि महायुतीच्या कार्यकर्त्यांमध्ये प्रतापराव पाटील यांची क्रेझ असून, सर्वांना सोबत घेऊन चालणारे नेतृत्व म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते.
भाजपमधील अंतर्गत नावे आणि महायुतीचा पेच
जरी शिंदे गटाकडून प्रतापराव पाटील यांचे नाव आघाडीवर असले, तरी भाजपकडूनही ही जागा राखण्यासाठी जोरदार मोर्चेबांधणी सुरू आहे. भाजपकडून सध्या तीन प्रमुख नावांची चर्चा आहे: नंदू आडवाणी,पक्षातील ज्येष्ठ आणि निष्ठावान चेहरा , डॉ. केतकी पाटील माजी खासदार डॉ. उल्हास पाटील यांच्या कन्या, ज्यांच्या निमित्ताने सुशिक्षित आणि महिला चेहरा देण्याचा भाजपचा प्रयत्न असू शकतो ,अमोल शिंदे (पाचोरा) ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन आणि आमदार मंगेश चव्हाण यांचे अत्यंत निकटवर्तीय मानले जाणारे अमोल शिंदे हे देखील शर्यतीत आहेत.
अंतिम निर्णय वेळेवरच, पण ‘प्रतापराव’ यांचे पारडे जड!
जळगावची ही जागा नेमकी कोणाच्या खिशात जाते आणि महायुतीचा अधिकृत उमेदवार कोण होतो, हे जरी ऐनवेळी स्पष्ट होणार असले, तरी सद्यस्थिती पाहता प्रतापराव गुलाबराव पाटील यांच्या नावाने जिल्ह्यात मोठी आघाडी घेतली आहे. वडिलांचे मार्गदशन, स्वतःचा जिल्हा परिषदेचा अनुभव आणि शिंदे गटातील घटलेली पकड यांमुळे प्रतापराव पाटील यांच्या गळ्यात उमेदवारीची माळ पडल्यास आश्चर्य वाटायला नको. त्यांच्या या संभाव्य उमेदवारीमुळे जळगावच्या राजकीय समीकरणांना एक नवी दिशा मिळणार, हे मात्र नक्की!









