प्रलंबित मागण्यांसाठी राज्यभर आंदोलन तीव्र; रिक्त पदे भरण्याची मागणी
जळगाव, (प्रतिनिधी) :- महाराष्ट्र राज्य विद्यापीठे व महाविद्यालयीन सेवक कृती संघाच्या वतीने राज्यातील सार्वजनिक विद्यापीठे आणि संलग्न महाविद्यालयांमध्ये कार्यरत शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी पुकारण्यात आलेल्या संपाचा आज पाचवा दिवस होता. दि. १४ मेपासून सुरू असलेल्या या आंदोलनाचा दुसरा टप्पा आजपासून सुरू करण्यात आला.

यावेळी शासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी करत कर्मचाऱ्यांनी आपल्या मागण्यांकडे सरकारचे लक्ष वेधले. “कर्मचारी संघटनेचा विजय असो”, “भिक नको हक्क हवा”, “कोण म्हणत देणार नाही, घेतल्याशिवाय राहणार नाही”, “अन्याय करणाऱ्या सरकारचा निषेध असो”, “आमच्या मागण्या मान्य करा, नाहीतर खुर्च्या खाली करा”, “रिक्त पदे भरलीच पाहिजेत”, “शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांवरील ताण कमी झाला पाहिजे”, तसेच “१०, २०, ३० आश्वासित योजना लागू झालीच पाहिजे” अशा विविध घोषणांनी विद्यापीठ परिसर दणाणून गेला.
आंदोलनाच्या दुसऱ्या टप्प्याची अधिकृत घोषणा यावेळी करण्यात आली. द्वारसभेनंतर संघटनेचे अध्यक्ष महेश पाटील, मागासवर्गीय संघटनेचे अध्यक्ष राजू सोनवणे तसेच सचिव अरुण सपकाळे यांनी कर्मचाऱ्यांना संबोधित करत शासनाने तातडीने मागण्या मान्य कराव्यात, अशी मागणी केली.
शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित प्रश्नांबाबत राज्य शासनाने सकारात्मक निर्णय घ्यावा, अन्यथा आंदोलन आणखी तीव्र करण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला.









