पाचोरा (प्रतिनिधी) :- शहरातील श्रीकृष्ण रेसिडेन्सी परिसरात घरफोडीची घटना उघडकीस आली असून चोरट्यांनी रोख रकमेसह सोन्या-चांदीचे दागिने असा एकूण १ लाख २४ हजार १७५ रुपयांचा मुद्देमाल लंपास केला आहे. याप्रकरणी पाचोरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, भारती रमेश मिस्तरी (वाघ, वय ४७, रा. श्रीकृष्ण रेसिडेन्सी, वॉर्ड स्कूलच्या मागे, प्लॉट नं. ४९, पाचोरा) या आपल्या कुटुंबासह बाहेरगावी गेल्या होत्या. ९ मे २०२६ रोजी सकाळी ८ ते १२ मे २०२६ रोजी सायंकाळी ६ वाजेच्या दरम्यान अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या बंद घराचे कुलूप तोडून घरात प्रवेश केला.
चोरट्यांनी घरातील ५० हजार रुपयांची रोख रक्कम, सुमारे १७ हजार ५०० रुपयांचे सोन्याचे कानातील दागिने, २३ हजार ६७५ रुपयांचे मणी मंगळसूत्र तसेच ३३ हजार रुपयांचे विविध सोन्या-चांदीचे दागिने असा एकूण १ लाख २४ हजार १७५ रुपयांचा ऐवज चोरून नेला.
या प्रकरणी पाचोरा पोलिस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम ३०५(अ), ३३१(३), ३३१(४) अन्वये घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक योगेश गणगे करीत आहेत.









