भुसावळ (प्रतिनिधी):- शहरातील राजगौंड हाऊसिंग सोसायटी परिसरात अज्ञात चोरट्यांनी बंद घर फोडून तब्बल २ लाख ९६ हजार ५०० रुपयांचा ऐवज लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी बाजारपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांकडून चोरट्यांचा शोध सुरू आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, भगवानराम भाऊ दुपारे (वय ६४, व्यवसाय – रेल्वे पेन्शनर, रा. राजगौंड हाऊसिंग सोसायटी, रामदेवबाबा नगर, खडका रोड, भुसावळ) यांनी फिर्याद दिली आहे. दि. ५ मे रोजी सकाळी ७ वाजेपासून ते ८ मे रोजी सकाळी ९ वाजेदरम्यान अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या घरात प्रवेश करून रोकड व सोन्या-चांदीचे दागिने चोरून नेले.
चोरीमध्ये सुमारे १ लाख रुपये रोख रक्कम तसेच सोन्या-चांदीचे दागिने असा एकूण २ लाख ९६ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल लंपास करण्यात आला आहे. घटनेची माहिती मिळताच बाजारपेठ पोलीस ठाण्याचे निरीक्षक राहुल वाघे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला.
या प्रकरणी भारतीय न्याय संहिता कलम ३०५, ३३१ (१)(२), ३२४ (४)(५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोउनि राजू सांगळे करीत आहेत.











