यावल (प्रतिनिधी):- तालुक्यातील चुंचाळे येथे विहिरीत पाय घसरून पडल्याने १६ वर्षीय मुलाचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना बुधवारी सायंकाळी घडली. न्याजोद्दीन तडवी असे मृत मुलाचे नाव असून, या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, चुंचाळे येथील गाव विहिरीजवळ न्याजोद्दीन तडवी हा बुधवारी सायंकाळी खेळत होता. खेळता खेळता अचानक त्याचा पाय घसरला आणि तो खोल विहिरीत कोसळला. मुलगा विहिरीत पडल्याचे लक्षात येताच ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेत शोधमोहीम सुरू केली. विहिरीतील पाण्याचा अंदाज येत नसल्याने तातडीने डांभुर्णी येथील पट्टीच्या पोहणाऱ्यांना पाचारण करण्यात आले.
रात्री उशिरा शोध पथकाला न्याजोद्दीनचा शोध घेण्यात यश आले. त्याला तत्काळ विहिरीबाहेर काढून यावल ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र डॉक्टरांनी त्याला तपासून मृत घोषित केले. रुग्णालयात शवविच्छेदन केल्यानंतर गुरुवारी मृतदेह कुटुंबीयांच्या स्वाधीन करण्यात आला. या प्रकरणी यावल पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार संदीप सूर्यवंशी पुढील तपास करत आहेत.











