जुन्या हायवे परिसरात उघडकीस आला प्रकार; रुग्णालयाला ५ हजारांचा दंड
जळगाव (प्रतिनिधी):- शहरातील जुन्या हायवे परिसरातील नाल्यांच्या सफाईदरम्यान बायोमेडिकल वेस्ट उघडपणे नाल्यात टाकल्याचा धक्कादायक प्रकार बुधवारी उघडकीस आला. या प्रकरणी महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाने डॉ. दिगंबर पाटील यांच्या रुग्णालयावर ५ हजार रुपयांचा दंडात्मक कारवाई केली आहे.


पावसाळ्यापूर्वी नाल्यांची साफसफाई सुरू असताना महानगरपालिकेचे स्वच्छता कर्मचारी जुन्या हायवे परिसरातील नाल्यातील गाळ आणि कचरा काढत होते. यावेळी नाल्यात मोठ्या प्रमाणात वैद्यकीय कचरा आढळून आला. या कचऱ्यात वापरलेल्या सिरिंज, सलाईनच्या रिकाम्या बाटल्या, अर्धवट वापरलेली औषधे तसेच गंभीर आजारांच्या उपचारासाठी वापरण्यात येणाऱ्या इंजेक्शनचा समावेश होता.
घातक स्वरूपाचा हा बायोमेडिकल कचरा उघड्यावर फेकल्यामुळे परिसरात तीव्र दुर्गंधी पसरली होती. नाल्यातील हा प्रकार पाहून नागरिकांनी संताप व्यक्त करत तातडीने महापालिकेच्या आरोग्य विभागाला माहिती दिली.
आरोग्य विभागाने घटनास्थळी पाहणी करून तपास केला असता संबंधित कचरा डॉ. दिगंबर पाटील यांच्या रुग्णालयातून टाकण्यात आल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर महापालिकेकडून रुग्णालयावर ५ हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला. दरम्यान, बायोमेडिकल वेस्टची योग्य विल्हेवाट न लावणाऱ्या रुग्णालयांवर कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही प्रशासनाकडून देण्यात आला आहे.








