दामिनी काटोले विद्यालयात प्रथम; विज्ञान व वाणिज्य शाखा सुरू करण्याचा संस्थेचा मानस
शिरसोली (प्रतिनिधी):- येथील बारी समाज माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाने फेब्रुवारी २०२६ मध्ये झालेल्या बारावीच्या (HSC) परीक्षेत घवघवीत यश संपादन करत आपली गुणवत्तापूर्ण निकालाची परंपरा यंदाही कायम राखली आहे. या परीक्षेत विद्यालयातील विद्यार्थिनींनी बाजी मारली असून, गुणवंत विद्यार्थ्यांचा नुकताच संस्था आणि विद्यालयातर्फे गौरव करण्यात आला.

गुणवंतांचा गौरव: विद्यालयातून प्रथम येण्याचा मान दामिनी गोकुळ काटोले (७३.३३%) हिने पटकावला. तसेच मीनाक्षी भगवान ताडे (७०.००%) ही द्वितीय, तर भूमिका गोकुळ पाटील (६६.८३%) हिने तृतीय क्रमांक मिळवला. या तीनही यशस्वी विद्यार्थिनींचा सत्कार संस्थेचे अध्यक्ष निलेश खलसे, शालेय समितीचे चेअरमन दिलीप बारी आणि सदस्य प्रवीण पाटील यांच्या हस्ते करण्यात आला.
विज्ञान व वाणिज्य शाखा सुरू करणार: कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून बोलताना निलेश खलसे यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले. भविष्यात शिरसोलीतील विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी विद्यालयात विज्ञान (Science) आणि वाणिज्य (Commerce) शाखा सुरू करण्याचा मनोदय त्यांनी यावेळी बोलून दाखवला.
मान्यवरांची उपस्थिती: या कार्यक्रमाला शालेय समितीचे चेअरमन दिलीप बारी, सदस्य प्रवीण पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज बारी, संचालक राजेश आंबटकर, अशोक काटोले, मुख्याध्यापक राजेंद्र आंबटकर आणि पर्यवेक्षक सुनील भदाणे प्रामुख्याने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक उच्च माध्यमिक विद्यालयाचे प्रमुख प्रा. मनोज बारी यांनी केले, तर मुख्याध्यापक राजेंद्र आंबटकर यांनी मनोगत व्यक्त केले. उपशिक्षिका देवका पाटील यांनी विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीसाठी मोलाचे मार्गदर्शन केले. यशस्वी विद्यार्थ्यांनी देखील आपल्या भावना व्यक्त केल्या. याप्रसंगी विद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.









