सावदा (प्रतिनिधी):- येथील रावेर रस्त्यावरील HDFC बँकेसमोर एका भरधाव अज्ञात वाहनाने दिलेल्या जोरदार धडकेत ८७ वर्षीय वृद्ध महिलेचा जागीच मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. धक्कादायक बाब म्हणजे, अपघात झाल्यानंतर चालक जखमी वृद्धेला कोणतीही मदत न करता वाहन घेऊन घटनास्थळावरून पसार झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सावदा येथील रहिवासी सोनाबाई भास्कर लोखंडे (वय ८७) या रविवारी (३ मे २०२६) दुपारी १२ ते १ वाजेच्या सुमारास सावदा-रावेर रस्त्यावरून जात होत्या. HDFC बँकेपासून साधारण ५० मीटर अंतरावर असताना, एका भरधाव अज्ञात वाहनाने रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून सोनाबाईंना जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात गंभीर दुखापत झाल्याने सोनाबाईंचा करुण अंत झाला.
याप्रकरणी मृताचा नातू दीपक दगडू लोखंडे (वय ३७, रा. ख्वाजा नगर, सावदा) यांनी सावदा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यावरून अज्ञात वाहन चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दाखल कलमे: सावदा पोलिसांनी अज्ञात चालकाविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम १०६(१), १२५(अ), १२५(ब), २८१ आणि मोटर वाहन कायद्याच्या कलम १८४, १३४(अ)(ब) नुसार गुन्हा नोंदवला आहे.
हा अपघात इतका भीषण होता की त्यात वृद्धेचा जागीच मृत्यू झाला. मात्र, माणुसकीला काळिमा फासणाऱ्या चालकाने तिथे न थांबता पळ काढला. या प्रकरणाची माहिती तात्काळ वरिष्ठ पोलीस अधिकार्यांना देण्यात आली आहे. घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक राहुल सानप हे करत आहेत.
या घटनेमुळे सावदा परिसरात हळहळ व्यक्त होत असून, फरार चालकाला तात्काळ अटक करण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे.









