धुळे राज्य उत्पादन शुल्काची मोठी कारवाई
जळगाव (प्रतिनिधी):- शिरपूर राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या हाडाखेड सीमा तपासणी नाक्याच्या पथकाने सांगवी शिवार परिसरात मोठी कारवाई केली आहे. मुंबई-आग्रा महामार्गावर एका बोलेरो पिकअपमधून चाललेली अवैध स्पिरिटची वाहतूक पकडण्यात आली असून, वाहनासह एकूण ७ लाख २४ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

राज्य उत्पादन शुल्क आयुक्त डॉ. राजेश देशमुख, सह-आयुक्त प्रसाद सुर्वे, विभागीय उपायुक्त श्रीमती यु. आर. वर्मा आणि धुळे अधीक्षक श्रीमती स्वाती काकडे यांच्या आदेशानुसार सीमावर्ती भागात गस्त वाढवण्यात आली आहे. हाडाखेड नाक्याचे दुय्यम निरीक्षक एम. डी. पाटील यांना गुप्त बातमीदाराकडून माहिती मिळाली की, पळासनेरकडून शिरपूरच्या दिशेने एका बोलेरो पिकअप (क्र. एमएच ०१ सीआर ४४६९) मधून अवैध स्पिरिट नेले जात आहे. या माहितीच्या आधारे सांगवी शिवारातील एच.पी. पेट्रोल पंपाजवळ सापळा रचून संशयित वाहन तपासले असता, त्यात ३५ लिटर क्षमतेचे सात प्लास्टिक ड्रम मिळून आले. या ड्रममध्ये एकूण २४५ लिटर शुद्ध मद्यार्क (स्पिरिट) भरलेले होते.
या कारवाईत स्पिरिट आणि वाहन असा एकूण ७ लाख २४ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे?
कारवाईदरम्यान वाहन चालक आणि मालक फरार झाले असून, त्यांच्याविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी अधिनियमाच्या विविध कलमान्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे. सदरची यशस्वी कारवाई दुय्यम निरीक्षक एम. डी. पाटील, एस. एस. निकम, जवान गोरख पाटील आणि प्रशांत बोरसे यांच्या पथकाने केली. या प्रकरणाचा पुढील तपास अधीक्षक स्वाती काकडे यांच्या मार्गदर्शनाखाली दुय्यम निरीक्षक एम. डी. पाटील करीत आहेत. दरम्यान, अवैध मद्य निर्मिती किंवा वाहतुकीबाबत कोणतीही माहिती असल्यास जनतेने १८००२३३९९९९ या टोल फ्री क्रमांकावर किंवा ८४२२०MD०११३३ या व्हॉट्सॲप क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन विभागामार्फत करण्यात आले आहे.









