महापालिकेत समर्थकांचा जल्लोष
जळगाव (प्रतिनिधी):- जळगाव शहर महानगरपालिकेच्या रिक्त असलेल्या स्वीकृत नगरसेवक पदासाठी बुधवारी, १५ एप्रिल रोजी झालेल्या विशेष महासभेत सर्वपक्षीय ७ उमेदवारांची एकमताने निवड करण्यात आली. यामध्ये भारतीय जनता पक्षातर्फे ४, शिवसेना (शिंदे गट) २ आणि शिवसेना (ठाकरे गट) १ अशा सदस्यांचा समावेश आहे. निवडीची घोषणा होताच महानगरपालिका प्रशासकीय इमारतीच्या प्रांगणात ढोल-ताशांच्या गजरात गुलालाची उधळण करत जोरदार जल्लोष करण्यात आला.

महासभेत पीठासीन अधिकारी तथा महापौर दीपमाला काळे यांनी नवीन स्वीकृत नगरसेवकांच्या नावांची अधिकृत घोषणा केली. यात भारतीय जनता पक्षतर्फे जिल्हाध्यक्ष डॉ. राधेश्याम चौधरी, रमेश मतानी, प्रदीप रोटे, सुभाष शौचे, शिवसेना (शिंदे गट)तर्फे हर्षल मावळे, नरेंद्र आत्माराम पाटील, शिवसेना (ठाकरे गट)तर्फे महानगरप्रमुख शरद तायडे यांची निवड जाहीर झाली.
निवडीनंतर महापौर दीपमाला काळे आणि उपमहापौर मनोज चौधरी यांनी नवनियुक्त सदस्यांना पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा दिल्या. या विशेष महासभेला स्थायी समिती सभापती डॉ. चंद्रशेखर पाटील, महानगरपालिका आयुक्त ज्ञानेश्वर ढेरे, नगर सचिव सतीश शुक्ला यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी आणि नगरसेवक उपस्थित होते. निवडीची प्रक्रिया अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. यानंतर आता महापालिकेत एकूण ८२ नगरसेवक झाले आहेत. यात भाजपचे संख्या ४६ वरून ५०, शिवसेनेची संख्या २५ तर शिवसेना ठाकरे गटाची संख्या ७ वर पोहोचली आहे.
महासभा संपल्यानंतर नवनियुक्त नगरसेवकांचे समर्थक आणि कार्यकर्त्यांनी महानगरपालिका परिसरात मोठी गर्दी केली होती. पालिकेच्या प्रांगणातून विजयी उमेदवारांची भव्य मिरवणूक काढण्यात आली. ‘एकच जल्लोष’ करत कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतिशबाजी केली. नवनियुक्त सदस्यांनी जळगाव शहराच्या विकासासाठी कटिबद्ध असल्याचे यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले.









