मूळ मालकांना ६० दिवसांची मुदत
जळगाव (प्रतिनिधी):- जळगाव शहर पोलीस स्टेशनच्या आवारात विविध गुन्ह्यांत जप्त केलेली ४५ बेवारस वाहने अनेक वर्षांपासून पडून आहेत. या वाहनांचे मालक मिळून न आल्याने आता या वाहनांचा जाहीर लिलाव करण्याचा निर्णय पोलीस प्रशासनाने घेतला आहे. या संदर्भात पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी १३ एप्रिल २०२६ रोजी अधिकृत जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे.

जळगाव शहर पोलीस ठाण्यांतर्गत दाखल असलेल्या विविध गुन्ह्यांमध्ये चोरीला गेलेल्या वाहनांसोबतच आरोपींकडून इतरही अनेक वाहने जप्त करण्यात आली होती. सद्यस्थितीत अशी ४५ वाहने पोलीस ठाण्याच्या ताब्यात आहेत. पोलिसांनी या वाहनांच्या मालकांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला, मात्र अद्याप कोणीही मालकी हक्काचा दावा करण्यासाठी पुढे आलेले नाही. बराच काळ उघड्यावर पडून राहिल्याने ही वाहने आता गंजून खराब होऊ लागली आहेत.
ज्या नागरिकांची वाहने गहाळ झाली आहेत किंवा ज्यांचे या जप्त वाहनांवर मालकी हक्क, तारण हक्क अथवा विमा हक्क आहेत, अशा व्यक्तींनी पुढील ६० दिवसांच्या आत (२ महिने) आवश्यक कागदपत्रांसह पोलीस ठाण्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.









