बनावट स्क्रीनशॉट पाठवून घातला गंडा
यावल (प्रतिनिधी):- दिल्ली येथे केळी पाठवून त्याचे पैसे न देता, बनावट बँक ट्रान्झॅक्शनचे स्क्रीनशॉट पाठवून एका केळी व्यापाऱ्याची ३ लाख ५७ हजार ५२१ रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकारणी यावल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

यावल तालुक्यातील निमगाव येथील रहिवासी आणि केळी व्यापारी ज्ञानेश्वर नामदेव महाजन (वय ५८) यांना ‘शुभम केला एजन्सी’ नावाचा वापर करणाऱ्या एका व्यक्तीने वेळोवेळी फोन केला. त्याने महाजन यांचा विश्वास संपादन करून त्यांना आपली केळी दिल्ली येथील ‘शिवनारायण भाईजी केला स्टोअर’ (पंजाबी बाग) येथे पाठवण्यास सांगितले.
दोन ट्रक भरून पाठवली केळ
व्यापाऱ्याच्या सांगण्यावरून फिर्यादी महाजन यांनी २३ मार्च ते २६ मार्च २०२६ दरम्यान दोन ट्रकद्वारे केळी पाठवली. आयशर ट्रक (RJ.11.GD.3736): १,६२,५०० रुपये किमतीची १५८.५० क्विंटल केळी व ट्रॉला ट्रक (RJ.11.GD.3847): १,९५,०२१ रुपये किमतीची १६४.२० क्विंटल केळी अशी पाठवली आहे.
अशी झाली फसवणूक
आरोपीने सदर माल दिलेल्या पत्त्यावर खाली न करता तो दुसऱ्याच ठिकाणी वळवला. जेव्हा फिर्यादीने पैशांची मागणी केली, तेव्हा आरोपीने ‘फिनो पेमेंट ॲप्लिकेशन’द्वारे बनावट ट्रान्झॅक्शन तयार केले. ‘एसबीआय’ बँकेच्या मशीनमध्ये चेक टाकल्याचे भासवून त्याचे खोटे स्क्रीनशॉट महाजन यांना व्हॉट्सॲपवर पाठवले. प्रत्यक्षात महाजन यांच्या खात्यात कोणतीही रक्कम जमा झाली नाही. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच महाजन यांनी पोलिसांत धाव घेतली.
या प्रकरणी ज्ञानेश्वर महाजन यांच्या फिर्यादीवरून यावल पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपासी अधिकारी: पोलीस नाईक वसीम तडवी तपास करत आहेत. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून, व्यापाऱ्यांनी अनोळखी व्यक्तींशी व्यवहार करताना काळजी घेण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.









