वाहनाची तोडफोड करून केली मारहाण, बॅनरच्या वादातून गुन्हेगाराचे कृत्य
जळगाव(प्रतिनिधी):- डॉ. बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक उत्सव समितीचे अध्यक्ष तथा महाराष्ट्र जनक्रांती मोर्च्याचे प्रदेशाध्यक्ष मुकुंद सपकाळे यांच्यावर अज्ञात हल्लेखोरांनी शनिवार दि. ११ एप्रिल रोजी दुपारी ३ वाजेच्या सुमारास जीवघेणा हल्ला केला आहे. या हिंसक घटनेत सपकाळे यांच्या चारचाकी वाहनाची भीषण तोडफोड करण्यात आली असून, स्वतः सपकाळे हे या हल्ल्यात जखमी झाले आहेत. विशाल अहिरे नावाच्या गुन्हेगाराने त्याच्या साथीदारांच्या मदतीने एक कृत्य केल्याचे मुकुंद सपकाळे यांनी माध्यमांना सांगितले आहे.


शनिवारी दुपारच्या सुमारास मुकुंद सपकाळे हे आपल्या नियोजित कामासाठी गोविंदा रिक्षा स्टॉप पासून रिंग रोड मार्गे बहिणाबाई उद्यान चौकात जात असताना, हल्लेखोरांच्या एका टोळक्याने त्यांना हॉटेल सायली जवळ अडवले. बॅनर छपाईच्या कारणावरून झालेल्या वादाचे रूपांतर अचानक हिंसक वळणात झाले. हल्लेखोरांनी लाठ्या-काठ्या आणि शस्त्रांच्या सहाय्याने त्यांच्या वाहनावर हल्ला चढवला. हल्लेखोरांनी सपकाळे यांच्या चारचाकी वाहनाच्या सर्व बाजूने काचा फोडून वाहनाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान केले आहे.
वाहनाची तोडफोड केल्यानंतर हल्लेखोरांनी सपकाळे यांना लक्ष्य केले, ज्यामध्ये ते जखमी झाले आहेत. हल्ला होताच परिसरात आरडाओरड झाल्याने स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. नागरिकांचा वाढता हस्तक्षेप पाहून हल्लेखोर तिथून पसार झाले. जखमी मुकुंद सपकाळे यांना तातडीने जवळच्या रुग्णालयात हलवण्यात आले. सध्या त्यांच्यावर उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे.
या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळाचा पंचनामा केला. हल्ल्यामुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते, मात्र पोलिसांच्या चोख बंदोबस्तामुळे परिस्थिती नियंत्रणात आली आहे.या पुढील तपास पोलीस करित आहेत.









