विविध पक्ष, संघटना व शेतकऱ्यांचे प्रशासनाला निवेदन; १३ एप्रिल रोजी मोर्चाचे आयोजन
चाळीसगाव (प्रतिनिधी):- चाळीसगाव तालुक्यातील बेकायदेशीर व बेसुमार वाळू उत्खनन व वाहतूक यावर कायमस्वरूपी उपाययोजना करून कठोर कार्यवाही करावी, तसेच वाळू माफिया, वाहन चालक व वाहन मालकांवर मोक्का सारख्या कठोर कायद्यांतर्गत गुन्हे दाखल करून त्यांना पायबंद घालावा, अशी मागणी करणारे निवेदन दि. ४ रोजी माजी खासदार तथा शिवसेना नेते उन्मेष पाटील यांच्या उपस्थितीत प्रशासनाला देण्यात आले.


तसेच “गिरणा बचाव” या अभियानांतर्गत दि. १३ एप्रिल २०२६ रोजी मोर्चाचे आयोजन करण्यात येणार आहे. निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, चाळीसगाव तालुक्यात बेकायदेशीर गौण खनिज व वाळू उत्खनन मोठ्या प्रमाणात सुरू असून नदी-नाल्यांमधून लूट व तस्करी होत आहे. यामुळे मौजे रहिपुरी येथील एका निष्पाप बालिकेचा वाळूच्या डंपरमुळे मृत्यू झाल्याने तालुक्यात संतापाची लाट उसळली आहे.
तसेच वाळू माफिया, वाहन चालक व वाहन मालकांवर कठोर कारवाई करून त्यांना आळा घालावा. तालुक्यातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न, शेतीसाठीचे पाणी तसेच शहर व तालुक्याचे एकूण भवितव्य धोक्यात आले असल्याने शेतकरी, तरुण, विविध संस्था, संघटना व सर्व पक्ष एकत्र येऊन दि. १३ एप्रिल २०२६ रोजी “गिरणा बचाव” या माध्यमातून मोर्चा काढणार आहेत. संबंधित सर्व प्रमुख अधिकाऱ्यांनी या मोर्चाला सामोरे जाऊन वस्तुनिष्ठ कार्यवाही करून अहवाल सादर करावा, अशी मागणीही करण्यात आली आहे.
यावेळी माजी खासदार उन्मेष पाटील, माजी पंचायत समिती सदस्य दिनेश बोरसे, माजी नगरसेवक चंद्रकांत तायडे, शेख चिरागउद्दीन, नरेंद्र जैन, खुशाल बिडे, दिलीप पाटील, राहुल पाटील, विशाल धनगर आदी उपस्थित होते.









