महापौर दीपमाला काळे यांच्या संकल्पनेतून जळगावच्या दोन्ही ‘बी.जे. मार्केट’चा कायापालट
जळगाव (प्रतिनिधी):- गेल्या १५ वर्षांपासून प्रलंबित असलेल्या समस्या निकाली काढण्यासाठी जळगाव शहर महानगरपालिकेच्या कर्तव्यदक्ष महापौर दीपमाला काळे यांनी आक्रमक पाऊल उचलले आहे. ‘माझं जळगाव, स्वच्छ जळगाव’ या ब्रीदवाक्यानुसार, महापौरांच्या संकल्पनेतून गुरुवारी आणि शुक्रवारी जुन्या व नव्या दोन्ही बी.जे. मार्केटमध्ये विशेष साफसफाई अभियान राबवण्यात आले.


नगरसेवकांच्या प्रश्नांची दखल, प्रशासनाची कारवाई
नुकत्याच झालेल्या महासभेत शिवसेनेचे गटनेते विष्णू भंगाळे आणि नगरसेविका अर्चना पाटील यांनी मार्केटमधील अस्वच्छतेबाबत प्रश्न उपस्थित केले होते. या प्रश्नांची तातडीने दखल घेत आरोग्य विभागातर्फे गुरुवारी (२ एप्रिल) व शुक्रवारी (३ एप्रिल) स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. यामध्ये मार्केटमधील प्रसाधनगृहांची पूर्ण स्वच्छता करण्यात आली. कर्तव्यात कसूर करणाऱ्या ठेकेदाराला ‘कारणे दाखवा’ नोटीस बजावण्याची कार्यवाहीदेखील सुरू झाली आहे.
अतिक्रमण निर्मूलन आणि सोयी-सुविधांवर भर
केवळ स्वच्छताच नाही, तर मार्केटचा परिसर मोकळा करण्यासाठी अतिक्रमण विभागाने आजूबाजूचे अतिक्रमण हटवले आहे. तसेच, विद्युत विभागातर्फे ज्या ठिकाणी पथदिवे नाहीत, तिथे सर्वेक्षण पूर्ण करून नवे दिवे लावण्याचे काम युद्धपातळीवर सुरू झाले आहे. तुटलेले रेलिंग आणि इतर किरकोळ बांधकामांची पाहणी बांधकाम विभागाने केली असून, पुढील १५ दिवसांत हे काम पूर्ण करण्याचे आश्वासन अधिकाऱ्यांनी दिले आहे.
महापौरांकडून थेट पाहणी आणि आदेश
शुक्रवारी सकाळी महापौर दीपमाला काळे यांनी स्वतः मार्केटमध्ये जाऊन सुरू असलेल्या कामांची पाहणी केली. यावेळी मार्केटमध्ये साचणारे पाणी आणि प्रसाधनगृहांच्या गळतीबाबत त्यांनी संताप व्यक्त करत, या त्रुटी तात्काळ दूर करण्याचे आदेश संबंधित विभागाला दिले.
मार्केट असोसिएशनकडून महापौरांचे आभार
मार्केटमधील बदल पाहून मार्केट असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी महापौरांची भेट घेऊन त्यांचे आभार मानले. “अनेक वर्षांपासून या समस्या ‘जैसे थे’ होत्या, मात्र महापौरांच्या पुढाकारामुळे मार्केटने मोकळा श्वास घेतला आहे. हे अभियान यापुढेही सुरू राहावे, यासाठी आम्ही महापालिकेला पूर्ण सहकार्य करू,” असे आश्वासन पदाधिकाऱ्यांनी दिले.
हे अभियान आरोग्य विभागाचे सहाय्यक आयुक्त उदय पाटील यांच्या नेतृत्वाखाली अधिकारी रमेश कांबळे, स्वच्छता निरीक्षक रुपेश भालेराव, मुकेश पाटील, मयूर सपकाळे, मुकादम विशाल चांगरे, बीव्हीजी सुपरवायझर संदीप शर्मा आणि गणेश कोळी यांच्या टीमने यशस्वी केले.










