जिल्हापेठ पोलिसांची मोठी कारवाई
जळगाव ( प्रतिनिधी ):- शहरातील जिल्हापेठ पोलीस स्टेशनच्या पथकाने दुचाकी चोरीच्या गुन्ह्याचा छडा लावत दोन संशयित आरोपींना अटक केली आहे. त्यांच्याकडून चोरीची एक होंडा ड्रीम मोटार सायकल जप्त करण्यात आली आहे.
जळगाव येथील नवीन बस स्थानक परिसरातून एक मोटार सायकल चोरीला गेली होती. याप्रकरणी जिल्हापेठ पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता.
जिल्हापेठ पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी अनिल वाघ यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे तपासासाठी एक विशेष पथक तयार करण्यात आले होते. तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे पोलिसांनी संशयितांचा शोध घेतला आणि दोघांना ताब्यात घेतले. आकाश राजू खरे (रा. नांद्रा, ता. पाचोरा; सध्या मुक्काम पिंप्राळा हुडको, जळगाव), आकाश प्रकाश भिल (रा. कासमपुरा, ता. पाचोरा)
न्यायालयाकडून एक दिवसाची पोलीस कोठडी मिळाल्यानंतर, आरोपींची सखोल चौकशी करण्यात आली. या चौकशीदरम्यान त्यांनी जळगाव शहरातील भज्जी गल्ली येथून मोटार सायकल चोरी केल्याची कबुली दिली. त्यांच्या माहितीवरून पोलिसांनी होंडा ड्रीम मोटार सायकल (क्रमांक एमएच १९ डीए ५०११) जप्त केली आहे.
ही कारवाई जळगावचे पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुरे आणि प्रभारी अधिकारी अनिल वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण करण्यात आली. या पथकात पोलीस उपनिरीक्षक शांताराम देशमुख, पोलीस हवालदार महेश महाजन, महेंद्र पाटील, मिलिंद सोनवणे, तुषार पाटील, विशाल साळुंके, गोविंद साबळे आणि जयेश मोरे यांचा समावेश होता. या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस हवालदार महेंद्र पाटील करत आहेत.










